हिंडेनबर्ग अहवालावर अदानी पहिल्यांदाच जाहीरपणे बोलले

gautam-adani

हिंडेनबर्ग अहवालावरून निर्माण झालेल्या वादावर मंगळवारी अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. अदानी ग्रुपच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गौतम अदानी म्हणाले की, “हा समूहाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आहे. हा अहवाल स्वत:चा फायदा लक्षात घेऊन आणि चुकीच्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आला आहे. या अहवालाचा उद्देश कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती खाली आणून नफा कमावणे हा होता. गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेऊन आम्ही आमचा पूर्ण सदस्यता घेतलेला एफपीओ काढून घेतला आहे,”

यावेळी अदानी म्हणाले की, “आमचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे.” वाईट काळात साथ देणाऱ्या सर्व संबंधितांचेही यावेळी त्यांनी आभार मानले. ते म्हणाले की, “आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की या संकटाच्या काळातही आपण कोट्यवधींची आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आणली. त्याचवेळी कोणत्याही रेटिंग एजन्सीने आमचे रेटिंग कमी केले नाही.”

2023 मध्ये, समूहाचा EBIDTA 36% ची वाढ नोंदवण्यात यशस्वी झाला आहे. या कालावधीत अदानी समूहाचा EBIDTA 57,219 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. त्याच वेळी, 85 टक्के वाढीसह, एकूण उत्पन्न 2.62 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. करानंतरचा नफाही 82 टक्क्यांनी वाढून 23,509 कोटी रुपयांवर पोहोचल्याचे गौतम अदानी म्हणाले.

यंदाच्या जानेवारी महिन्यात अमेरिकेतील शॉर्ट सेलर कंपनी हिंडनबर्गने अदानी समूहावर गंभीर आरोप केले होते. या कंपनीने तेव्हा सेल कंपन्यांच्या माध्यमातून अदानी समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले असल्याचे सांगितले होते. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत मोठी घसरण झाली. या अहवालानंतर अदानी समूहाला आपला FPO देखील मागे घ्यावा लागला.