गीताबोध – धृतराष्ट्र जन्मांध-कर्मांध

>> गुरुनाथ तेंडुलकर

भगवद्गीतेच्या पहिल्याच श्लोकात धृतराष्ट्राने संजयला विचारलेला प्रश्न…

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव ।

मामकाः पांडवाश्च इव किम अकुर्वत संजय ।।

“हे संजया, या धर्मक्षेत्रावर, या कुरुक्षेत्रावर युद्धाला उत्सुक असलेल्या माझ्या मुलांनी आणि पांडवांनी काय काय केलं?”

धृतराष्ट्राच्या या प्रश्नातच एक खोच दडलेली आहे. वास्तविक धृतराष्ट्र हा कुरुकुलाचा राजा होता. पाच पांडव हेदेखील कुरुकुलातीलच होते. तरीही धृतराष्ट्र संजयला विचारतो की, “माझ्या मुलांनी आणि पांडवांनी काय केलं?”

याचा सरळ अर्थ म्हणजे धृतराष्ट्र पांडवांना आपलं मानतच नाही. पांडव त्याच्यासाठी परके आहेत हे सिद्ध झालं. वास्तविक राजा हा कुणा एकाचा नातेवाईक नसतो. तो सगळ्या प्रजेचा पालनकर्ता असतो, पिता असतो. त्याच्या दृष्टीने सर्व प्रजाजन सारखेच असतात, असायला हवेत. त्यामुळे कुणावरही अन्याय झाला तर अन्याय करणारा कोण आहे हे न पाहता त्या अन्यायाचं निराकरण करायला हवं. अन्याय झालेल्या माणसांना योग्य तो न्याय मिळवून देणं आणि  अन्याय करणाऱयांवर योग्य ती कारवाई करून त्यांना शासन करणं हे राजाचं मूलभूत कर्तव्य मानलं जातं, पण धृतराष्ट्राने हे कर्तव्य कधीच केलं नाही.

धृतराष्ट्राच्या मुलांनी म्हणजेच कौरवांनी पांडवांवर सुरुवातीपासूनच अनेक अन्याय, अत्याचार केले. भीमाला विषमिश्रित अन्न खायला घालून त्याला बेशुद्धावस्थेत नदीत फेकून दिलं. पुढे लाक्षागृहात म्हणजे लाखेसारख्या अत्यंत ज्वालाग्राही पदार्थापासून बनवलेल्या घरामध्ये कोंडून पांडवांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. कपटी शकुनीमामाच्या सहाय्याने धर्मराजाला द्यूतात फसवून त्याचं संपूर्ण राज्य ताब्यात घेतलं. हरलेल्या धर्मराजाला द्रौपदीला पणावर लावण्यासाठी उकसवलं आणि त्यानंतर…त्यानंतर भर सभेत द्रौपदीला केसांना धरून फरफटत दरबारात आणली आणि तिची अवहेलना करून वस्त्रहरणाचा प्रयत्न केला. त्यानंतर पांडवांना चौदा वर्षे वनवासात आणि एक वर्ष अज्ञातवासात पाठवलं.

पंधरा वर्षांनंतर पांडव वनवासातून परतून आल्यानंतरदेखील दुर्योधनाने त्यांना त्यांचं हक्काचं राज्य देण्यास नकार दिला आणि  “सुईच्या अग्रावर राहील एवढी जमीनही तुम्हाला देणार नाही” अशी दर्पोक्ती केली.

कौरवांनी पांडवांवर केलेले हे सर्व अन्याय-अत्याचार धृतराष्टाला माहीत होते, पण राजा असूनही धृतराष्ट्राने कधीही दुर्योधन आणि इतर कौरवांना समजावण्याचा प्रयत्न केला नाही. कोण कुणावर अन्याय करतो आहे हे उमगूनदेखील त्याने आंधळ्या पुत्रप्रेमापोटी प्रत्येक वेळी दुर्योधनालाच पाठीशी घातलं आणि आज…

आज युद्धाच्या आरंभीदेखील धृतराष्ट्र हेच विचारतोय की, “माझ्या मुलांनी आणि पांडवांनी काय केलं?”

भगवद्गीतेतील पहिल्याच श्लोकातून धृतराष्ट्राने कुणाचा पक्ष घेतला हे सिद्ध होतं.

विनोबांनी ‘गीताई’मध्ये या श्लोकाचा भावार्थ लिहिलाय…

त्या पवित्र कुरुक्षेत्री पांडूचे आणि आमुचे ।

युद्धार्थ जमले तेंव्हा वर्तले काय संजया ।।

म्हणजेच पांडूची मुलं ही आमची नव्हेत, असं धृतराष्ट्र मानत होता. धृतराष्ट्राबद्दल बोलायचं तर मी म्हणेन की, तो केवळ डोळ्यांनी अंध नव्हता, तर तो बुद्धीनेही अंध होता. ज्याला योग्य आणि अयोग्य यातील फरक कळत नाही, ज्याला न्याय आणि अन्याय यातील भेद उमगत नाही, त्याला बुद्धीनं अंध असंच म्हणावं लागेल. तो कर्मांधदेखील होता. राजाची कर्मे आणि कर्तव्ये त्याने कधीच पाळली नाहीत.

या पहिल्या श्लोकावर भाष्य करताना श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात…

तरी पुत्रस्नेहे मोहितु । धृतराष्ट्र असे पुसतु ।

म्हणे संजया सांगे मातु । कुरुक्षेत्रीची ।।

ज्ञानेश्वर माऊली धृतराष्ट्र पुत्रप्रेमामुळे कसा मोहवश झाला होता हे एकाच शब्दात सांगून जातात.

असो…असा राजा असला की, सगळीकडे अधर्माचंच साम्राज्य फोफावतं. महाभारत काळात नेमकं हेच झालं होतं. अधर्म, अविवेक, अत्याचार बोकाळले होते आणि धर्माला मात्र ग्लानी आली होती. म्हणूनच तर भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत पुढे म्हणतात…

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।

अभ्युत्थानं अधर्मस्य तदात्मानं सृजामि अहम् ।।

परित्राणाय साधूनाम् विनाशायच दुष्कृताम् ।

धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ।।

भावार्थ : ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येऊन अधर्माचं राज्य माजतं त्या वेळी सज्जनांचं  रक्षण करून आणि दुष्टांचा विनाश करून धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो.

।। श्री कृष्णार्पणमस्तु ।।