फिर एक बार मोदी सरकार… आम्ही रस्त्यावरच पाणी भरणार!; ‘हर घर जल’ योजनेचा नगरमध्ये बोजवारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला ‘हर घर जल’ योजनेचा नगर जिह्यात बोजवारा उडाला आहे. नागरिकांना नळाद्वारे घरात पाणी देण्याचे केंद्र सरकारचे आश्वासन फोल ठरले असून, महिलांना रस्त्यावर पाणी भरण्याची वेळ आल्याचे वास्तव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी समोर आणले आहे.

जलवाहिनी फुटून रस्त्यावर पाणी वाहत असलेल्या ठिकाणी एक महिला पाणी भरत असून, समोरच्या भिंतीवर मोदींची जाहिरातबाजी करण्यात आल्याचे दिसून येत आहे. हा विरोधाभास असून, मोदी सरकारच्या काळात नागरिकांना सुविधा मिळत नसल्याचेच हे वास्तव चित्र आहे. रस्त्यावर पाणी भरत असलेल्या महिलेकडे विचारपूस केल्यानंतर ‘आम्हाला आठ-आठ दिवस पाणीच येत नाही,’ असे तिने सांगितले. आम्हाला पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, येथे पाणी फुटले आहे. त्यातूनच भरून घेण्याची वेळ आली आहे, असे तिने सांगितले.

ही महिला ‘जलजीवन मिशन’अंतर्गत येणाऱया खळेवाडी, भिंगार येथे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या सुमारे 200 कोटी खर्चाच्या लाभार्थी गावातील आहे. पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा नगर जिह्यात बोजवारा उडाला आहे. आजच्या घटनेवरून सोशल मीडियातून मोदी सरकारवर प्रचंड टीका करण्यात येत आहे. ‘फिर एक बार मोदी सरकार… आम्ही रस्त्यावरच पाणी भरणार’ अशी टीका नेटकऱयांनी केली आहे.