हेमंत गोडसे भाजपाच्या काळय़ा यादीत;  लोकसभेसाठी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू

मिंधे गटाला आऊट करण्यासाठी भाजपाने जबरदस्त फिल्डींग लावली आहे. कथित सर्व्हेत नावच येत नसल्याने भाजपाने खासदार हेमंत गोडसे यांचा काळ्या यादीत समावेश केला आहे. लोकसभेसाठी नव्या चेहर्‍याची शोध मोहीम सुरू आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या खर्‍या शिवसेनेच्या ताकदीवर, शिवसैनिकांच्या पाठबळावर हेमंत गोडसे हे नाशिक लोकसभा मतदारसंघात सलग दोनवेळा खासदार झाले. हे विसरून गद्दारी करीत ते मिंधे गटात सामील झाले.

मतदारसंघात आमचेच सर्वाधिक आमदार, नगरसेवक असे हिणवत भाजपाने त्यांची सुरुवातीपासूनच कोंडी सुरू केली. महापालिकेतील माजी सभागृह नेते दिनकर पाटील हे भाजपाचे स्वयंघोषित उमेदवार म्हणून जोमाने प्रचार करून गोडसेंना उघड शह देत आहेत. कार्यअहवालाच्या पुस्तिकाही त्यांनी घरोघरी वाटल्या आहेत. शिस्तप्रिय भाजपाने मात्र पाटलांना याबाबत कुठलीही आडकाठी केली नाही की, जाब विचारला नाही. असे असले तरी भाजपाकडून तिसर्‍याच नव्या चेहर्‍याची शोध मोहीम सुरू आहे. चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर, नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांना पक्षाने विचारणा केली, त्या दोघांनीही नकार दिल्याचे सांगण्यात येते. ढिकलेंना तर भाजपाने उमेदवारीची गळच घातली आहे.

नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तपोवनात जाहीर सभा झाली. त्यावेळी व्यासपीठामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा उमेदवारीच्या नकारावरून ढिकले यांना पक्षाच्या शिस्तीची स्पष्टता दिली. आपण नाही म्हणून चालत नाही, पक्षात आपल्या मर्जीप्रमाणे ठरत नाही. प्रसंगी पक्षाने सांगितले तर मलासुद्धा नागपूरमधून लढावे लागेल. त्यामुळे आपण म्हणू तेच होईल असे न समजता लोकसभेच्याही तयारीत राहा, असेच सांगून टाकल्याची चर्चा भाजपा वर्तुळात आहे.
मिंधे गटाला जागा सोडली तरी हेमंत गोडसे विजयी होणार नाही, सर्व्हेत त्यांचे नाव कुठेच येत नाही. त्यांनी सर्वांगीण विकासापेक्षा वैयक्तिक विकासाकडे अधिक लक्ष दिल्याने त्यांचा पराभव निश्चित आहे, असा अहवाल तयार करून भाजपाने त्यांना काळ्या यादीत टाकले आहे. या ‘बुद्धी’बळाच्या खेळात मिंधे गट ऐनवेळी जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचे प्यादे पुढे करणार आहे, ते मूळ भाजपेयी असल्याने चालून जातील अन् जागाही मिंधे गटाकडेच राहील, अशी खेळी आहे. मात्र, बोरस्तेंनी भाजपालाही टांग दिली असल्याने तेही पराभूत होतील, एक जागा गमावण्यापेक्षा ती भाजपाकडे घेवून नव्या चेहर्‍याला संधी द्यावी, अशी फिल्डींग भाजपाने लावल्याने मिंधे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.