हादराबाद; टॉम हार्टलीने हिंदुस्थानचे केले हार्ट ब्रेक, इंग्लंडचा 28 धावांनी थरारक विजय

आज हैदराबाद हिंदुस्थानी संघासाठी ‘हादराबाद’ ठरला आणि कोटय़वधी क्रिकेटप्रेमींचे हार्टब्रेकही झाले आणि पहिल्या डावात 190 धावांची प्रचंड आघाडी घेणार्या हिंदुस्थानला विजयासाठी 231 धावांचे माफक आव्हानही पेलवले नाही. पदार्पणवीर टॉम हार्टलीने हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींचे हार्ट ब्रेक करताना यजमानांचा डाव 202 धावांतच गुंडाळून अनपेक्षित हादरा दिला. आता पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली.

ओली पोप इंग्लंडला मोठी आघाडी मिळवून देणार असे वाटत असतानाच अवघ्या एका धावेत इंग्लंडचे 3 फलंदाज बाद करून हिंदुस्थानने 7 बाद 419 वरून सर्वबाद 420 अशी अवस्था केली. त्यामुळे हिंदुस्थानसमोर हैदराबाद जिंकण्यासाठी 231 धावा करायच्या होत्या. आव्हान माफक होतं, पण हिंदुस्थानी फलंदाजांनी मात खाल्ली. रोहित शर्मा आणि यशस्वी जैसवालच्या चांगल्या सलामीला पर्दाणवीर टॉम हार्टलीने 42 धावांवरच रोखले. पहिल्या डावात 80 धावा करणारा जैसवाल 15 धावांवर कोसळला. पण येथूनच हिंदुस्थान बॅकफूटवर गेला. अवघ्या एका चेंडूनंतर शुबमन गिलने पुन्हा एकदा अपेक्षाभंग केला आणि इंग्लंडने सामन्यावर आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली.

हार्टलीच्या फिरकीने हिंदुस्थानी फलंदाजीला हार्ट अॅटॅक

तीन चेंडूंत जैसवाल आणि गिलला बाद करत हार्टलीने हिंदुस्थानी फलंदाजीला हार्ट अॅटॅक आणला. रोहितची 39 धावांची खेळीही त्यानेच रोखली आणि अक्षर पटेलचा (17) अडथळाही दूर केला. शंभरीतच चार खंदे गेल्यामुळे हिंदुस्थान अडचणीत होती आणि रूटने के. एल, राहुलला बाद करत हिंदुस्थानचा अर्धा संघ 107 धावांतच गारद केला. हिंदुस्थानची अवस्था बिकट होत चालली होती. पहिल्या डावात हिंदुस्थानला 190 धावांची आघाडी मिळवून देणारा रवींद्र जाडेजा (2) धावबाद झाला आणि हिंदुस्थानी संघ हादरला. त्याच धावसंख्येवर श्रेयस अय्यरला लीचने बाद करून हिंदुस्थानची 7 बाद 119 अशी दुर्दशा केली आणि सामन्यावरील आपली पकड अधिक घट्ट केली. मात्र त्यानंतर श्रीकर भरत आणि रविचंद्रन अश्विनने आठव्या विकेटसाठी 57 धावांची भागी करत हिंदुस्थानला विजयाची स्वप्नं दाखवली. या जोडीचा खेळ भन्नाट होता, पण हार्टलीने ही जोडी पह्डून हिंदुस्थानचा पराभव निश्चित केला. दोघांना एका धावेच्या अंतरात बाद केले. 9 बाद 177 नंतर जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराजने 25 धावांची भागी रचत हिंदुस्थानचा पराभव काहीकाळ लांबवला. अखेर हार्टलीने सिराजला बाद करत इंग्लंडच्या संस्मरणीय विजयावर शिक्कामोर्तब केले. आपला पहिलाच कसोटी सामना खेळत असलेल्या हार्टलीने 62 धावांत 7 विकेट घेत विक्रमी पदार्पण केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

गिल है की खेलता नहीं…

गेल्या वर्षी वन डेसह कसोटीतही धावांचा पाऊस पाडणाऱया शुबमन गिलला अपयशाने घट्ट मिठी मारल्यामुळे आता त्याच्या स्थानाबाबतही हिंदुस्थानी संघाला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. गेल्या सहा कसोटीतील अकरा डावांत त्याने 13, 18, 6, 10, नाबाद 29, 2, 26, 36, 10, 23, 0 अशा अपयशी खेळी केल्या आहेत. त्याने 17 च्या सरासरीने केवळ 173 धावा केल्या आहेत. त्याचे अपयश हिंदुस्थानी संघाला चांगलेच महागात पडत आहे.

पदार्पणातच सर्वोत्तम

कसोटी इतिहासात पदार्पणाच्या कसोटीच्या एका डावात आठ गोलंदाजांनी 8 विकेट घेण्याची किमया साधली आहे. यात इंग्लंडचा एकही गोलंदाज नाही. मात्र डॉमिनिक कॉर्कने इंग्लंडसाठी पदार्पणात सर्वोत्तम गोलंदाजी करतना 43 धावांत 7 विकेट टिपले होते. तसेच जॉन लिव्हर, अॅलेक बेडसर आणि जेम्स लँगरिज या गोलंदाजांनी पदार्पणातच सात विकेट बाद केले. आता या चार गोलंदाजांनंतर हार्टलीचेही नाव घेतले जाईल.

पोपच्या खेळीने इंग्लंडमध्ये जान

हिंदुस्थान आणि इंग्लंडविरुद्धचा सामना स्पिनबॉल विरुद्ध बॅझबॉल असा रंगण्याची चिन्हे होती. पहिल्या दोन दिवसांत हिंदुस्थानने कसोटीवर आपली पकड मजबूत करताना 190 धावांची आघाडी घेतली होती. पण तिसऱया दिवशी ओली पोपने सामना फिरवला. 5 बाद 163 अशा बिकट अवस्थेत असलेल्या पाहुण्यांवर सामना तिसऱयाच दिवशी गमावण्याचे संकट होते, पण पोपची तोफ धडाडली आणि त्याने इंग्लंडला पराभवात बाहेर काढत सावरले. शनिवारीच पोपच्या घणाघाती शतकी खेळीने इंग्लंडला 126 धावांची आघाडी मिळवून दिली होती. आज त्यात पोपच्याच 196 धावांच्या जिगरबाज खेळीने 230 धावांची आव्हात्मक आघाडी मिळवून दिली. त्याने आज रेहान अहमदसह सातव्या विकेटसाठी 64 धावांची भागी रचली, तर टॉम हार्टलीबरोबर 80 धावांची अभूतपूर्व भागी रचत संघाची आघाडी दोनशे पलीकडे नेली. पण तेव्हाच एका धावेत 3 विकेट बाद करून इंग्लंडचा डाव अनपेक्षितपणे 420 धावांवर संपवला. यात पोपचे द्विशतक अवघ्या 4 धावांनी हुकले.

नेमके कुठे चुकलो, सांगणे कठीण – रोहित शर्मा

पहिल्या डावातील 190 धावांच्या आघाडीने हिंदुस्थानने कसोटीवर आपला दबदबा निर्माण केला होता. पण ओली पोपच्या 196 धावांच्या खेळीने पूर्ण सामनाच फिरवला. त्याची खेळीही हिंदुस्थानी खेळपट्टीवर एका विदेशी फलंदाजाने साकारलेल्या सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे. मला वाटले 231 धावांचे आव्हान आम्ही सहजगत्या पार करू, पण तसे घडले नाही. आमच्या गोलंदाजांनी अचूक मारा केला, पण पोपने त्यापेक्षा सुंदर फलंदाजी केली. सामन्यात एक किंवा दोन चुका पाहून चालणार नाही. आमच्या आघाडीच्या फलंदाजांनी घोर निराशा केली तर तळाच्या फलंदाजांनी संघर्षमय खेळ करत फलंदाजी कशी करायला हवे ते दाखवून दिले. विजय समोर होता, तरीही आम्ही हरलो. नेमपं कुठे चुकलो हेच सांगणं कठीण आहे. अजून चार कसोटी बाकी आहेत. आम्हाला साहसी खेळ दाखवावा लागेल.