श्रीलंकेला वर्ल्ड कपचे तिकीट, आता दुसऱ्या स्थानासाठी झिम्बाब्वे-स्कॉटलंडमध्ये चुरस

बुलावायो, दि. 2 (वृत्तसंस्था) – जे पॅरेबियन्सना जमले नाही ते सिंहली वाघांनी करून दाखवले. श्रीलंकेने झिम्बाब्वेचे 165 धावांचे माफक आव्हान 101 चेंडू आणि 9 विकेट राखून सहज पार पाडत वर्ल्ड कप पात्रता फेरीचे युद्ध जिंकले. दोन वेळा जगज्जेता असलेला विंडीज संघ प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर फेकला गेला, मात्र श्रीलंकेने पात्रता फेरीचे दिव्य सहजगत्या पार पाडत विजयाचा षटकार खेचला आणि आपले हिंदुस्थानातील आयसीसी वन डे वर्ल्ड कपचे तिकीट मिळविले. श्रीलंका वर्ल्ड कपमध्ये खेळणारा नववा संघ ठरला असून आता दहाव्या संघासाठी झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड यांच्यात 4 जुलैला अखेरची लढत खेळली जाईल.

1996 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करीत जगज्जेतेपद पटकावले होते. त्यानंतर 2007 आणि 2011 सालच्या वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीतही श्रीलंकेने धडक मारली होती, पण दोन्ही वेळेला त्यांना जगज्जेतेपदाची पुनरावृत्ती करता आली नव्हती. विंडीजप्रमाणे लंकाही तीनदा वर्ल्ड कपची फायनल खेळली आहे, पण विंडीजला पात्रता फेरीचा टप्पा गाठता आला नाही, मात्र श्रीलंकेने आपल्या विजयातील सातत्य कायम राखत झिम्बाब्वेला नमवले आणि आपल्या सलग विजयाचा षटकार ठोकला.

आजच्या लढतीपूर्वीच दोन्ही संघांचे गुण समान असल्यामुळे जो जिंकेल त्याला वर्ल्ड कपचे तिकीट मिळणार, हे स्पष्ट होते. श्रीलंकेने दिलशान मधुशंका आणि महिश तीक्ष्णा यांच्या गोलंदाजीच्या जोरावर झिम्बाब्वेचा डाव 32.2 षटकांत 165 धावांवरच गुंडाळला. मधुशंकाने आघाडीच्या तिन्ही फलंदाजांना 30 धावांत बाद करून झिम्बाब्वेच्या डावाला सुरुंग लावला. त्यानंतर सीन विल्यम्सने या सामन्यातही झुंजार खेळ दाखवला. गेल्या पाच डावांत ना. 102, 91, 23, 174, 142 अशा जबरदस्त खेळय़ा करणाऱ्या विल्यम्सने 58 धावांची खेळी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण तो बाद झाल्यावर अर्ध्या संघाने 38 धावांची भर घातली आणि ते 165 पर्यंत पोहोचले. विल्यम्सने या स्पर्धेत 118 धावांच्या सरासरीने 588 धावा ठोकल्या आहेत. यात 3 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. मधुशंकाने 15 धावांत 3 तर तीक्ष्णाने 25 धावांत 4 विकेट टिपल्या.

166 धावांचा पाठलाग करताना पथुम निस्सांका स्कॉटलंडच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने दिमुथ करूणारत्नेबरोबर 103 धावांची सलामी दिल्यानंतर कुसल मेंडिससह 66 धावांची अभेद्या भागी रचत विजयी लक्ष्य 34 व्या षटकातच गाठून वर्ल्ड कप पात्रता फेरीचा अडथळा पूर्ण केला. निस्सांकाने स्पर्धेतील पहिले शतक झळकावताना 102 चेंडूंत 101 धावांची खेळी केली.

 झिम्बाब्वे-स्कॉटलंड दोघांनाही संधी

येत्या 4 जुलैला झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड यांच्यात होणारा सुपर सिक्स सामन्यात झिम्बाब्वेने बाजी मारली तर ते वर्ल्ड कपसाठी पात्र ठरतील. दुसरीकडे स्कॉटलंडने झिम्बाब्वेला पराभूत केले तर त्यांना वर्ल्ड कपचे तिकीट लाभेल. सध्या झिम्बाब्वे 6 गुणांसह स्कॉटलंडच्या पुढे आहे तर स्कॉटलंडचा नेट रनरेट झिम्बाब्वेपेक्षा सरस असला तरी दोन्ही संघांना वर्ल्ड कपमध्ये पात्र ठरण्यासाठी मंगळवारच्या सुपर सिक्स सामन्यात केवळ विजय अनिवार्य आहे. नेट रनरेटचा काहीही संबंध नाही.