पक्षाने आदेश दिला, तर निवडणूक लढणार – आमदार लंके

‘पक्षाकडून आदेश आला, तर आपण निवडणूक लढायला तयार आहोत,’ असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. तर, ‘राणी लंके यांच्या ‘आम्ही लोकसभेची निवडणूक लढविणार’ या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला,’ असेही लंके यांनी नगर येथे बोलताना सांगितले.

आमदार लंके म्हणाले, ‘राणी लंके यांनी काढलेल्या ‘शिवस्वराज्य यात्रे’ला नगर दक्षिणमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचावे, हा या यात्रेमागील उद्देश होता. ‘मी एक पक्षाला मानणारा साधा कार्यकर्ता आहे. मी अजित पवार गटामध्ये गेलो आहे. पक्ष जे सांगेल, त्याचे पालन आम्ही करू,’ असे सांगत, ‘पक्षाने निवडणूक लढण्यास सांगितले, तर आम्ही तयार आहोत,’ असे लंके यांनी सांगितले.

‘नगरच्या लोकसभा मतदारसंघात कोणी साखर वाटतंय, कोण डाळ वाटतंय, कोण काय करतंय, हे पाहत बसण्यापेक्षा मी कामाला महत्त्व देणारा कार्यकर्ता आहे. मी कधीच कोणाच्याही कामात हस्तक्षेप करीत नाही,’ असे सांगत नाव न घेता त्यांनी विखे यांना लक्ष्य केले.

मी बाहेर गेलो होतो!

महायुतीच्या मेळाव्याला तुम्हाला निमंत्रण नव्हते, असे विचारताच आमदार लंके म्हणाले, ‘भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी मला फोनद्वारे मेळाव्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, मी कामानिमित्त बाहेरगावी गेलो होतो,’ असे सांगत त्यांनी याबाबत बोलण्याचे टाळले.

नेतृत्व सांगेल त्याप्रमाणे काम करणार – राणी लंके

‘मी ‘शिवस्वराज्य यात्रा’ काढली त्याला नगर दक्षिणमधून चांगला प्रसाद मिळाला,’ असे राणी लंके यांनी सांगितले. यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार का? असे विचारले असता, ‘पक्षश्रेष्ठाr जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल,’ असे त्यांनी सांगितले.

‘शिवस्वराज्य यात्रे’चा नगरमध्ये समारोप

फटाक्यांची आतषबाजी, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा देत जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली नगर दक्षिण मतदारसंघात काढण्यात आलेल्या ‘शिवस्वराज्य यात्रे’चा आज नगर शहरात समारोप झाला. नगर दक्षिणमधील पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, राहुरी, नगर या तालुक्यांत ही यात्रा काढण्यात आली. नगरमधील बस स्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून यात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी राणी लंके यांच्या रॅलीवर 13 जेसीबींमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.