तिसऱ्या दिवशी इंग्लंडवर शुबमन गिल बरसला, हिंदुस्थानला जिंकण्यासाठी 9 विकेट्सची आवश्यकता

इंग्लंडविरुद्ध विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस शुभमन गिलने आपल्या नावावर केला. एकप्रकारे गिलने त्याच्यावर टीका करणाऱ्यांनी बोलती बंद केली. यशस्वीचे द्वीशतक, बुमराहचा भेदक मारा आणि आता शुभमन गिलच्या दमदार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडपुढे 399 धावांचे आव्हान ठेवले आहे.

यशस्वी जयसवालच्या शानदार द्विशतकामुळे टीम इंडियाने पहिल्या डावात 396 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव केवळ 253 धावांवरच आटोपला. पहिल्या डावाच्या आधारे हिंदुस्थानकडे 143 धावांची आघाडी होती. यानंतर टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात शुभमन गिलने (104) शतक ठोकून टिकाकारांची बोलती बंद केली आणि गिलने ठोकलेल्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाचा डाव 225 धावांवरच आटोपला. त्यामुळे आता इंग्लंडल विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य पुर्ण करायचे आहे.

तिसऱ्या दिवसाच्या खेळात टीम इंडियाला चांगली सुरुवात करता आली नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि फॉर्मात असलेला यशस्वी हिंदुस्थानला चांगली सुरुवात करुन देतील अशी सर्वांना आशा होती. पण रोहित शर्माने सर्वांच्या अपेक्षेवर पाणी फेरले आणि अवघ्या 13 या धावसंख्येवर त्याला जेम्स अँडरसनने बाद केले. त्यानंतर जयसवालला सुद्धा अँडरसनने रोहितच्या पाठोपाठ माघारी पाठवले. अवघ्या 30 धावांवर दोन विकेट पडल्यानंतर गिल आणि श्रेयस अय्यर यांनी मिळून डावाची धुरा सांभाळली. दोघांनी मिळून 81 धावांची भागीदारी केली. मात्र, श्रेयसला मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि त्याला रेहान अहमदने बाद केले. मात्र गिलच्या बॅटने तळपायला सुरुवात केली आणि 332 दिवसांनी गिलने शतक झळकावले. गिलच्या शतकामुळे टीम इंडिया मजबूत स्थितीमध्ये आली. गिलने 147 चेंडूंचा सामना करत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या. इंग्लंडसाठी घातक ठरणाऱ्या गिलला शोएब बशीरने बाद करुन हिंदुस्थानला मोठा धक्का दिला.

शुभमन गिल बाद झाल्यानंतर बाकीचे फलंदाज विशेष काही करू शकले नाही. टीम इंडियाने शेवटच्या पाच विकेट अवघ्या 45 धावांत गमावल्या. त्यामुळे हिंदुस्थाचा दुसरा डाव 225 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून टॉर्म हार्टलीने सर्वाधीक चार आणि रेहान अहमदने तीन विकेट घेतल्या. तसेच जेम्स अँडरसनला दोन, तर शोएब बशीरला एक विकेट घेण्यात यश आले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने एका गड्याच्या मोबदल्यात 67 धावा केल्या आहेत. रविचंद्रन अश्विनने आपल्या फिरकीच्या जाळ्यात बेन डकेटला अडकले आणि त्याची विकेट घेतली. यष्टीरक्षक जॅक क्रॉली 29 आणि रेहान अहमद 9 धावांवर नाबाद आहेत. इंग्लंडला विजयासाठी आणखी 332 धावा करायच्या आहेत. तर हिंदुस्थानला विजयासाठी 9 विकेट्सची आवश्यकता आहे.