टीम इंडियाने उतरवलं ‘बॅझबॉल’चं भूत, धर्मशाळेत इंग्लंडला डावाने हरवत मालिका 4-1 ने जिंकली

टीम इंडिया आणि इंग्लंड संघात पाच कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. धर्मशाळेमध्ये मालिकेतील अखेरचा सामना खेळला गेला. या लढतीत टीम इंडियाने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला. हैदराबाद येथे झालेला मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतरही टीम इंडियाने जोरदार पुनरागमन करत इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ क्रिकेटला धुळ चाळत पाच सामन्यांची मालिका 4-1 अशी खिशात घातली.

तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने आपला पहिला डाव 8 बाद 473 धावांवरून पुढे सुरू केला. काल 27 धावांवर नाबाद असलेला कुलदीप यादव आणखी 3 धावांची भर घालून बाद झाला. जेम्स अँडरसनने त्याला बाद केले. अँडरसनचा तो 700 वा बळी ठरला. त्यानंतर शोएब बशीरने बुमराहला बाद करत विकेटचा ‘पंच’ ठोकला. मात्र तोपर्यंत टीम इंडियाची आघाडी 260 पर्यंत पोहोचवली.

त्यानंतर 100 वी कसोटी खेळणाऱ्या आर. अश्विनने इंग्लंडच्या फलंदाजीला भगदाड पाडले. अश्विनने एकामागोमाग 3 विकेट्स घेत इंग्लंडची अवस्था 3 बाद 36 अशी केली. यानंतर फलंदाजीला आलेल्या जॉनी बेअरस्टोने आक्रमक अंदाजात फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र कुलदीप यादवने त्याला 39 धावांवर पायचित पकडले.

बेअरस्टो बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजींनी खेळपट्टीवर हजेरी लावण्याचे काम केले. मात्र एका बाजुने ज्यो रूटने नांगर टाकला आणि त्याने अर्धशतक ठोकले. अखेर कुलदीप यादवने रुटला बुमराह करवी झेलबाद करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

टीम इंडियाकडून आर. अश्विनने सर्वाधिक पाच बळी घेतले. तर कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येक एक बळी घेतला. रवींद्र जडेजालाही एक बळी मिळाला. दोन्ही डावात मिळून 7 विकेट आणि फलंदाजीत 30 धावांचे योगदान देणाऱ्या कुलदीप यादवला ‘सामनावीर’, तर मालिकेत 700हून अधिक धावा करणाऱ्या जशस्वी जैस्वाल याला ‘मालिकावीर’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)