बारामती, माढामध्येही अपक्षांच्या हाती ‘तुतारी’; मतदारांमध्ये संभ्रम होण्याची शक्यता

राज्यात दुसऱया टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला होणार असून त्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे उमेदवारांच्या प्रचार, बैठका, सभा यांना वेग आला आहे. मोठय़ा राजकीय पक्षांबरोबरच अपक्ष उमेदवारही प्रचारात रंगले आहेत. अशा वेळी बारामती आणि माढामधील अपक्ष उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हाशी साम्य असलेले तुतारीचे चिन्ह निवडणूक निशाणी म्हणून देण्यात आले आहे. यामुळे ऐन मतदानावेळी मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होऊ शकतो. दरम्यान, अपक्षांच्या चिन्हांखालील तुतारी हा शब्द बदलावा, अशी मागणी राष्ट्रवादीने आयोगाकडे केली आहे.

बारामती मतदारसंघासाठी 51 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांच्या छाननीमध्ये पाच अर्ज बाद होऊन 46 उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. त्यापैकी आठ जणांनी अर्ज माघारी घेतला तर दोन जणांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये सोयल शहा युनूस शहा शेख या अपक्ष उमेदवाराला ‘तुतारी’ हे चिन्ह देण्यात आले.

माढातही तुतारी चिन्हामुळे गोंधळ

माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांचे निवडणूक चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे, मात्र बारामतीप्रमाणे माढा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रामचंद्र घटुकडे यांनाही निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह दिले आहे. या चिन्हाविरोधातही राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

तुतारीऐवजी दुसरा शब्द द्यावा!

शेख यांना अपक्ष उमेदवाराकरिता तुतारी चिन्हाच्या वाटपाला आमची हरकत आहे. दोन्ही चिन्हांच्या नावामधे साधर्म्य असल्याने चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस व तुतारी हे नाव सारखे आहे. राज्यपक्ष म्हणून आम्हास वाटप केलेले चिन्ह (तुतारी फुंकणारा माणूस) या नावात तुतारी या नावात साम्य असल्याने मतदारांचा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे मराठी नावातील तुतारी हा शब्द बदलून त्या ठिकाणी दुसरा शब्द निवडणूक आयोगाने द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.