IND vs ENG – आजपासून बॅझबॉलची फिरकी, हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना

आपल्या बॅझबॉल क्रिकेटने कसोटी क्रिकेटला आक्रमक आणि रंगतदार करणारा इंग्लंडचा संघ आता हिंदुस्थानातही नव्या प्रयोगाला सज्ज झालाय. हैदराबादच्या खेळपट्टीवरही आपल्या बॅझबॉलचा प्रभाव दिसावा म्हणून इंग्लंडने संघात चक्क तीन फिरकीवीरांना संधी दिलीय तर यजमान हिंदुस्थाननेही इंग्लिश आव्हानाला तोंड देण्याची तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे बॅझबॉल खेळात फिरकीवीर वेगवान गोलंदाजांनी फिरकी घेतात की फलंदाजांची हे उद्यापासून दिसेलच.

गेली अडीच वर्षे इंग्लंडने बॅझबॉलरूपी आक्रमक खेळ करून अवघ्या जगात आपली वेगळीच प्रतिमा उभी केली आहे. आता बेन स्टोक्सचे नेतृत्व आणि प्रशिक्षक ब्रॅण्डन मॅकलमच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडचा संघ हिंदुस्थानातही आपली तीच छाप पाडण्यासाठी सज्ज झालेत. हिंदुस्थानी खेळपट्टय़ा या फिरकीला पोषक असतातच, पण हैदराबादची खेळपट्टी ही फिरकीप्रेमी असल्यामुळे इंग्लंड संघाला चार फिरकीवीरांचा आधार दिला आहे.

फिरकीसाठी ऍण्डरसन बाहेर

हैदराबादच्या खेळपट्टीवर फिरकीची जादू चालते याची कल्पना असल्यामुळे इंग्लंड संघ व्यवस्थापनाने चक्क इंग्लंडचा आजवरचा सर्वात यशस्वी गोलंदाज जेम्स ऍण्डरसनला संघाबाहेर बसवण्याचे धाडस दाखवले आहे. ऍण्डरसनने 183 कसोटी सामन्यांत 690 विकेट घेतले आहेत. त्याच्याऐवजी ओली पोप, बेन फॉक्स, रेहान अहमद आणि जॅक लीच हे फिरकीवीर खेळतील. त्याशिवाय लँकाशायरचा टॉम हार्टलेची पदार्पण करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. युवा बशीर अहमदला व्हिसा मिळण्यात उशीर झाल्यामुळे आता तो दुसर्या कसोटीत पदार्पण करू शकतो

ग्लोव्हज कुणाच्या हाती

हिंदुस्थानी संघात एक नव्हे तर तीन-तीन यष्टिरक्षकांची निवड करण्यात आली आहे. तसेच राहुलला यष्टिरक्षणाच्या जबाबदारीतून मुक्त केले जाणार असल्याचेही संकेत प्रशिक्षक राहुल द्रविडने दिले आहेत. त्यामुळे हिंदुस्थानी संघात यष्टिरक्षक म्हणून श्रीकर भरतला संधी मिळते की ध्रुव जुरेल पदार्पण करतो, हेसुद्धा कसोटीपूर्वीच कळू शकेल. तसेच संघात राहुलच यष्टिरक्षक असेल, असेही भाकीत वर्तवले जात आहे.

…तर युवा खेळाडूंना संधी कधी देणार?

विराट कोहलीने पहिल्या दोन कसोटी सामन्यांतून  माघार घेतल्यामुळे त्याच्या जागी अनुभवी चेतेश्वर पुजारा किंवा अजिंक्य रहाणेपैकी एकाच्या निवडीची शक्यता वर्तवली जात होती. पण संघ व्यवस्थापनाने युवा खेळाडूंना संधी देण्याचे धोरण अवलंबताना राजस्थानच्या रजत पाटीदारची निवड करत पुजारा-रहाणेची कसोटी कारकीर्द संपुष्टात आल्याचे संकेत दिले आहेत. याबाबत कर्णधार रोहित शर्माही आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाला, आम्ही सीनियर्सच्या निवडीबाबत विचार केला, पण युवा खेळाडूंना संधी कधी देणार? सीनियर्सना संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेणे कठीण होता. युवा खेळाडूंना चांगल्या परिस्थितीत संधी दिल्यानंतरच परदेशात खेळण्याची संधी देता येऊ शकते. त्यामुळे युवा खेळाडूंना संधी देणे महत्त्वाचे असल्याचे शर्माने स्पष्ट केले.

संघ निवडणे आव्हानात्मक

हिंदुस्थानच्या अकरा खेळाडूंची निवड करणे केवळ आव्हानात्मक नसून डोकेदुखी ठरतेय. तिसरा फिरकीवीर म्हणून अक्षर पटेल आणि कुलदीप यादवपैकी एकाची निवड करणे नक्कीच आव्हानात्मक आहे. पण सध्याची स्थिती पाहता कुलदीपपेक्षा अक्षरचे पारडे जड समजले जात आहे. हिंदुस्थानचा अंतिम संघ कसोटीपूर्वी जाहीर केला जाईल. अक्षर हा अष्टपैलू असल्यामुळे नक्कीच त्याची निवड निश्चित मानली जात आहे.

हिंदुस्थानचा संभाव्य संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा, के. एल. राहुल, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज

इंग्लंडचा संघ – बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जॉनी बेयरस्टो (यष्टिरक्षक), बेन डकेट, जॅक क्राऊली, बेन फॉक्स (यष्टिरक्षक), टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप, ज्यो रूट आणि मार्क वूड.