उद्घाटनानंतरही कलिनातील आंतरराष्ट्रीय वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी बंदच

तत्कालीन राज्यपाल, कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन झालेले मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील आंतरराष्ट्रीय वसतिगृह वर्ष उलटले तरी विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेले नाही. 8 जुलै रोजी या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यामुळे वर्षभरानंतर तरी विद्यार्थ्यांसाठी हे वसतिगृह खुले करण्यात यावे, या मागणीचे पत्र युवासेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना पाठविण्यात आले आहे. 

आंतरराष्ट्रीय वसतिगृहासोबत उद्घाटन झालेले मुलींचे वसतिगृह 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यात आले होते, परंतु सदर वसतिगृहाला टँकरने पाणीपुरवठा होत होता. मुंबईचे माजी महापौर दिवंगत विश्वनाथ महाडेश्वर यांच्या सहकार्याने युवासेनेने पाण्याचा प्रश्न निकाली काढला. आंतरराष्ट्रीय वसतिगृहास महापालिका अथवा सरकारदरबारी परवानग्यांची आवश्यकता असल्यास युवासेनेला अवगत करावे. युवासेना विद्यापीठाला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे, असे युवासेनेच्या वतीने कुलगुरू डॉ. कुलकर्णी यांना पाठविलेल्या पत्रात माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी स्पष्ट केले. 

अभियंत्याअभावी अनेक कामे खोळंबली 

मुंबई विद्यापीठाचे अभियंता आपला कार्यकाळ संपवून त्यांच्या मूळ कार्यालयात परतले आहेत. त्यामुळे विद्यापीठाला तूर्त अभियंताच नाही. परिणामी अनेक कामे खोळंबली आहेत. विद्यापीठाने नवीन अभियंता नियुक्त करण्यासाठी तातडीने पुढाकार घ्यावा, अशी मागणीदेखील युवासेनेच्या वतीने करण्यात आली. विद्यापीठाने अभियंत्याचे ज्ञान असलेल्या अधिकाऱयाकडे पदभार सोपविला होता. मात्र त्यांनी पदभार स्वीकारण्यास नकार दिला. विद्यार्थ्यांना अपेक्षित आणि गरजेच्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी अभियंत्याच्या नेमणुकीसाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणीही युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे.