IPL 2024 – चेन्नईचा विजयी धमाका सुरू, आरसीबीचा 6 विकेट राखून केला पराभव

आयपीएलच्या धमाकेदार सलामीच्या लढतीत गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जने आपली विजयी मालिका कायम राखताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) 8 चेंडू आणि 6 विकेटनी सहज पराभव केला. शिवम दुबे आणि रवींद्र जाडेजाच्या झंझावाती भागीने चेन्नईच्या सुपर विजयावर 19व्या षटकात शिक्कामोर्तब केले.

अनुज रावत आणि दिनेश कार्तिकच्या 95 धावांच्या झुंजार आणि झंझावाती भागीच्या जोरावर आरसीबीने चेन्नईसमोर 174 धावांचे आव्हान उभारले. या धावांचा चेन्नईने सहज पाठलाग केला. कर्णधार म्हणून पहिलाच सामना खेळत असलेला ऋतुराज गायकवाड फार मोठी खेळी करू शकला नसला तरी पदार्पणवीर रचिन रवींद्रने 15 चेंडूंत 37 धावा ठोकत आपली ओळख करून दिली. त्यानंतर अजिंक्य रहाणे (27), डॅरिल मिचेल (22), शिवम दुबे (ना. 34) आणि रवींद्र जाडेजा (ना. 25) या प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पडत संघाला विजयी सलामी दिली.

तत्पूर्वी रंगारंग उद्घाटन सोहळय़ानंतर आयपीएलच्या फटकेबाजीसाठी फाफ डू प्लेसिसने टॉस जिंकून विराटसह मैदानात फलंदाजीला उतरण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने दमदार सुरुवात केली आणि  डू प्लेसिससह विराट कोहलीने पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागी रचली. डुप्लेसिसने आक्रमक सुरुवात करताना 23 चेंडूंत 35 धावा ठोकल्या. त्याने चक्क 8 चौकार ठोकले. मात्र विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेसा सूर सापडला नाही. त्याने 20 चेंडूंत 21 धावा केल्या, पण त्यात फक्त एक षटकारच ठोकता आला. मुस्तफिझूर रहमानने फाफची विकेट काढल्यानंतर रजत पाटीदारलाही षटकाच्या शेवटच्या चेंडूवर भोपळाही पह्डू दिला नाही. 41 धावांवर दोन धक्के बसल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलही शून्यावर बाद झाल्यामुळे बंगळुरू हादरला. बिनबाद 41 वरून 3 बाद 42. मग विराट आणि पॅमरून ग्रीनने ही पडझड रोखली. 12 व्या षटकात आरसीबीला परत दोन धक्के बसले आणि दोन्ही धक्के मुस्तफिझूरने दिले. त्याने आधी दुसऱ्या चेंडूवर विराटला बाद केले आणि चौथ्या चेंडूवर ग्रीनचा त्रिफळा उडवला. त्यामुळे आरसीबीची 3 बाद 77 वरून 5 बाद 78 अशी स्थिती झाली.

78 वर अर्धा संघ परतल्यावर चेन्नई सामन्यावर आपली पकड मजबूत करील असे वाटले होते. पण अनुज रावत आणि दिनेश कार्तिकने तसे होऊ दिले नाही. दोघांनी उर्वरित आठ षटकांचा खेळ आक्रमकपणे खेळून काढत संघाला पावणेदोनशेसमीप नेले. दोघांनी आपल्या 51 चेंडूंच्या खेळात 5 षटकार आणि 7 चौकार लगावत 95 धावा चोपून काढल्या. डावातील अठराव्या षटकात तुषार देशपांडेला तीन षटकार ठोकल्यामुळे आरसीबीच्या आव्हानात दम आला. डावाच्या शेवटच्या चेंडूवर रावत 48 धावांवर धावचित झाला. त्याने 25 चेंडूंत 4 चौकार आणि 3 षटकार ठोकले. कार्तिकने नाबाद 38 धावा केल्या. चेन्नईकडून मुस्तफिझूरने 29 धावांत 4 विकेट टिपण्याची करामत केली.

विराट 12 हजारी…

विराट कोहलीने आज सहावी धाव काढताच टी-20 क्रिकेटमध्ये आपल्या 12 हजार धावांचा पल्ला गाठला. तो ही कामगिरी करणारा पहिलाच हिंदुस्थानी फलंदाज ठरला आहे. आता त्याच्या धावांचा आकडा 12014 वर पोहोचला आहे. त्याच्यामागोमाग हिंदुस्थानकडून रोहित शर्मा (11156) आहे. आता विराटच्या पुढे ख्रिस गेल, शोएब मलिक, अॅलेक्स हेल्स आणि  डेव्हिड वॉर्नर हे चार फलंदाज आहेत आणि तो पाचव्या क्रमांकावर आहे.