IPL 2024 – दिल्ली सुपरफास्ट, सर्वात मोठ्या अन् वेगवान विजयाची नोंद

खलील अहमद, इशांत शर्मा आणि मुकेश कुमारच्या भेदक माऱयापुढे दिल्लीने गुजरातचा अवघ्या 89 धावांत खुर्दा उडवला आणि विजयी लक्ष्य गाठताना 4 फलंदाजांच्या मोबदल्यात 8.5 षटकांतच गाठत वेगवान विजय नोंदविला. हा यंदाच्या मोसमातील सर्वात मोठा आणि वेगवान विजय ठरला.

आज घरच्याच नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरातची ही दयनीय अवस्था पाहण्याचे दुर्दैव क्रिकेट चाहत्यांच्या पदरी पडले. गुजरातचे 90 धावांचे माफक लक्ष्य गाठताना पृथ्वी शॉ (7), जेक फ्रेझर (20), अभिषेक पोरेल (15) आणि शाय होप (19) यांचे विकेट 67 धावांत गमावले. त्यानंतर ऋषभ पंतने नाबाद 16 धावा करत संघाच्या विजयावर 67 चेंडू आधीच शिक्का मारला. 2 झेल आणि 2 यष्टिचीत करणारा पंतच दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

दिल्ली पॅपिटल्सने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीला आमंत्रित करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच ठरला. इशांत शर्माने आपल्या पहिल्याच षटकांत कर्णधार शुबमन गिलला बाद करून गुजरातला धक्का दिला. त्यानंतर गुजरातच्या डावाला एकामागोमाग एक असे हादरे बसत गेले. दिल्लीचा मारा इतका जबरदस्त होता की, पन्नाशीतच त्याचे सारे फलंदाज बाद झाल्यामुळे त्यांची 6 बाद 48 अशी दुर्दशा झाली होती. त्यानंतर राशीद खानने 31 धावांची खेळी करत गुजरातची धावसंख्या शंभरीपर्यंत नेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण त्याला अपयश आले आणि त्यांचा पूर्ण संघ 17.3 षटकांत 89 धावांवर आटोपला. हा गुजरातचा निचांक ठरला असून ते पहिल्यांदाच शंभरीच्या आत बाद झाले.