मुंबई इंडियन्समध्ये रोहितसोबत वाईट घडलं? मोठ्या खेळाडूने केला दावा

IPL 2024 सुरू होऊन बरेच दिवस झाले असले तरी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाचा वाद अजूनही थांबलेला नाही. रोहित शर्मा MI चा कर्णधार नाही हे अजूनही अनेक क्रिकेटपटूंना तसेच चाहत्यांनाही मान्य नाही. दररोज अनेक क्रिकेट तज्ज्ञ यावर आपापली मते मांडत आहेत. वीरेंद्र सेहवाग, नवज्योत सिंग सिद्धू आणि रवी शास्त्री यांच्यासह अनेक माजी क्रिकेटपटूंनी रोहितच्या कर्णधारपदावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यातच आता चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू अंबाती रायुडूने रोहित शर्माबद्दल भविष्यवाणी केली आहे.

अंबाती रायुडूने यापूर्वीच आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या य़ा हंगामात तो स्टार स्पोर्ट्ससाठी आयपीएल सामन्यांचे विश्लेषण करत आहे. यादरम्यान त्याला रोहित शर्मा बाबत काही प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये रोहित शर्माच्या आयपीएल लिलावात येण्याबाबत एक महत्तवाचा प्रश्न विचारण्यात आला. यावर रायडू म्हणाला की हे रोहितच्या इच्छेवर अवलंबून आहे. त्याला जिथे जायचे तिथे तो जाऊ शकतो. IPL चे सगळेच संघ त्याची कर्णधार म्हणून नक्कीच निवड करतील. मला ठाम विश्वास आहे की तो अश्या फ्रेंचायझीकडे जाईल जिथे त्याला मुंबईपेक्षा चांगली वागणूक मिळेल, असं तो म्हणाला आहे.

दरम्यान, हार्दिक पंड्याच्या कर्णधार पदावर याअधी सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग आणि नवज्योत सिंग सिद्धू या माजी भारतीय क्रिकेटपटूंनी अनेकदा भाष्य केले आहे. रवी शास्त्री म्हणाले की, जर MI ने कर्णधार बदलाबाबत अधिक चांगल्या पद्धतीने भाष्य केले असते तर हा वाद इतका वाढला नसता. तर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज आणि विश्वचषक विजेता कर्णधार मायकेल क्लार्क म्हणाला की, तो ही हार्दिकसारख्याच परिस्थितीतून गेला आहे. त्यामुळे रोहितने हार्दिकला सहाय्य केले पाहिजे.