IPL 2024 – बटलर नव्हे हिटलर; जॉसच्या शतकी जोशमुळे राजस्थानचा विक्रमी पाठलाग

एकाच सामन्यात दोन अप्रतिम शतकी खेळींचा नजराणा पाहण्याचे भाग्य लाभले. सुनील नारायणच्या झुंजार शतकामुळे कोलकात्याने 223 धावांचे जबरदस्त आव्हान ठेवले होते तर जॉस बटलरच्या हिटलर झंझावाती शतकी खेळीने राजस्थानला विक्रमी आणि संस्मरणीय विजय मिळवून दिला. शेवटच्या चेंडूंपर्यंत हृदयाचे ठोके चुकवणाऱया सामन्यात राजस्थानने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च यशस्वी पाठलाग केला.

आयपीएलच्या मध्यावर असताना नंबर वनसाठी झालेल्या लढतीत राजस्थानने बाजी मारली. 224 धावांचा पाठलाग करताना राजस्थानच्या डावाला खिंडार पाडण्याचे काम कोलकात्याच्या गोलंदाजांनी केले आणि सामन्यावर आपली घट्ट पकड केली. 121 धावांत राजस्थानचे सहा फलंदाज धारातीर्थी पडल्याने कोलकात्याचा विजय निश्चित मानला जात होता. पण बटलर आणि रोवमन पॉवेलने सामन्याला कलाटणी देणारी 57 धावांची भागी रचत राजस्थानच्या विजयाच्या आशा जिवंत केल्या. तेव्हाच 36 चेंडूंत अर्धशतक साजरा करणारा बटलर क्रूरकर्मा हिटलरप्रमाणे कोलकात्याच्या गोलंदाजीवर तुटून पडला आणि त्याने ईडन गार्डन्सवर षटकारांची आतषबाजी करत राजस्थानला विजयी ट्रकवर परत आणले आणि शेवटच्या चेंडूंवर विजयसुद्धा मिळवून दिला. त्याने 55 चेंडूंत शतक साकारले. हे त्याचे दुसरे शतक होय. त्याने शेवटच्या 3 षटकांत फलंदाजी करताना 4 षटकार आणि 3 चौकार लगावत राजस्थानला 46 धावा काढून दिल्या.

शतकी नारायण

त्याआधी कोलकातावासीयांना सुनील नारायणच्या शतकाचा झंझावात ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवता आला. 504 वा टी-20 सामना खेळणार्या सुनील नारायणने आपल्या कारकीर्दीतील पहिले शतक झळकावताना षटकार-चौकारांची आतषबाजी केली. त्याने 56 चेंडूंत 13 चौकारांसह 6 षटकार ठोकत 109 धावा ठोकत कोलकात्याला 223 अशी मोठी धावसंख्या उभारून दिली होती. सलामीला उतरलेल्या नारायणने 17.3 षटके एकहाती फलंदाजी करताना राजस्थानच्या गोलंदाजांना पह्डून काढण्याची जादू दाखवली. कोलकात्याच्या डावात अंगकृष रघुवंशी आणि रिंकू सिंग हे दोघेच धावांची विशी ओलांडू शकले.