हैदराबादचा 2 धावांनी थरारक विजय; रेड्डीच्या फटकेबाजीने हैदराबादला तारले, शशांक-आशुतोषची झुंज अपयशी ठरली

27 चेंडूंत 69 धावांचे प्रचंड आव्हान असताना शशांक सिंग आणि आशुतोष शर्माने केलेल्या फटकेबाजीने पंजाब किंग्जला विजयासमीप आणले, पण त्यांना अवघ्या दोन धावा कमी पडल्या आणि हैदराबादने आपल्या तिसऱया विजयाची थरारक नोंद केली.

हैदराबादसाठी धावांची टाकसाळ असलेल्या फलंदाजांच्या बॅटने मान टाकल्यानंतरही अननुभवी नितीश कुमार रेड्डीने 37 चेंडूंत केलेल्या 64 धावांची अफलातून खेळीने सनरायझर्सला पंजाब किंग्जविरुद्ध 9 बाद 182 अशी आव्हानात्मक मजल मारून दिली होती. त्याची खेळीच सामनावीर ठरली.

हैदराबादच्या 183 धावांचा पाठलाग करताना भुवनेश्वर कुमार आणि पॅट कमिन्सने पंजाबच्या झटपट तीन विकेट बाद करत 3 बाद 20 अशी अवस्था केली. त्यानंतर सॅम करण (29), सिकंदर रझा (28) आणि जितेश शर्मा (19) यांनी पंजाबला 114 पर्यंत नेले. 27 चेंडूंत 69 धावा हव्या असताना शशांक सिंग आणि आशुतोष शर्माने सामन्याची सूत्रे हातात घेत संघाला विजयाच्या ट्रकवर आणण्याचा प्रयत्न केला. 15 चेंडूंत 30 धावा काढल्यामुळे त्यांना 2 षटकांत 39 धावांची गरज होती. पण नटराजनने आपल्या या षटकांत केवळ दहा धावा देत पंजाबला विजयापासून दूर नेले. शेवटच्या सहा चेंडूंत 29 धावा हव्या असताना जयदेव उनाडकटने 3 वाईड टाकत हैदराबादच्या हृदयाचे ठोके वाढवले. आशुतोषने पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकत सामन्यात जान आणली. पण त्यानंतर पुढील ती चेंडूंवर उनाडकटने पाचच धावा दिल्या आणि हैदराबादचा विजय निश्चित केला. शेवटच्या चेंडूवर 9 धावांची गरज असताना शशांक सिंगने षटकार खेचला, पण पंजाब 2 धावांनी हरला. तत्पूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांकडून सर्वांनाच अपेक्षा असते. त्यांचा एक ना एक फलंदाज प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडतोच. पण आज तसे घडले नाही. अर्शदीप सिंगच्या भेदक माऱयाने ट्रव्हिस हेड (21) आणि एडन मार्करमला (0) बाद करून हैदराबादला एकाच षटकांत दोन हादरे दिले. मग अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठीनेही आपली स्वस्तात विकेट गमावल्यामुळे हैदराबादची 10 षटकांत 4 बाद 66 अशी अवस्था झाली होती.

अर्शदीपचा भेदक मारा 

आपल्या दुसऱयाच षटकांत हेड आणि मार्करमला बाद करणाऱया अर्शदीप सिंगने आपल्या तिसऱया षटकांत पुन्हा एकदा हैदराबाद दोन धक्के दिले. त्याने समद आणि रेड्डीला तीन चेंडूंत बाद करत हैदराबादच्या सुस्साट वेगाला ब्रेक लावला. तरीही शेवटच्या दोन षटकांत हैदराबादच्या तळाच्या फलंदाजांनी 26 धावा काढून संघाला 182 पर्यंत नेले. अर्शदीपने 29 धावांत 4 विकेट टिपल्या तर सॅम करण आणि हर्षल पटेलने प्रत्येकी दोन-दोन विकेट मिळवल्या.

नितीश कुमार रेड्डीची कमाल

आघाडीचे चार फलंदाज लवकर बाद झाल्यामुळे हैदराबादला एका आक्रमक खेळीची गरज होती आणि तो संघाच्या मदतीला धावून आला. त्याने हेन्रीक क्लासनच्या साथीने 36 धावांची भर घातली, पण क्लासन खेळपट्टीवर टिकण्याआधीच बाद झाला. तो फक्त 9 धावाच करू शकला. मात्र त्यानंतर अब्दुल समदबरोबर त्याची गट्टी जमली. दोघांनी केवळ 20 चेंडूंच फलंदाजी केली, पण संघाच्या धावसंख्येत 50 धावांची भर घालून हैदराबादचा स्कोअरच बदलून टाकला. समदने 12 चेंडूंत 5 चौकार ठोकत 27 धावा चोपल्या तर रेड्डीने हरप्रीत ब्रारच्या 15 व्या षटकांत 4,6,4,6,2 अशा धावा काढत 22 धावा वसूल केल्या. याच फटकेबाजीने हैदराबाद दीडशेपार नेले. रेड्डीने आपल्या अर्धशतकी खेळीत 5 षटकार आणि 4 चौकार लगावले.