IPL 2024 – समदुःखी मुंबई – पंजाब आमने सामने

घरच्या मैदानावरील संमिश्र यशानंतर मुंबई इंडियन्स आता पंजाब किंग्जच्या स्वारीवर मुल्लानपूरमध्ये डेरेदाखल झाला आहे. हे दोन्हीही संघ प्ले ऑफच्या शर्यतीत थोडे मागे पडले आहेत. म्हणून उभय संघांसाठी प्रत्येक लढत उपांत्य फेरीचीच ठरणार आहे. त्यामुळे गुरुवारी होणाऱया या तुल्यबळ लढतीत मुंबई व पंजाब हे समदुःखी असलेले संघ विजयासाठी मैदानावर जिवाचे रान करताना दिसतील.

मुंबई व पंजाब हे आयपीएलमधील सध्या तरी समदुःखी संघ आहेत. कारण दोन्ही संघांनी सहापैकी 4-4 लढती गमाविल्या असून गुणतालिकेत पंजाब सातव्या, तर मुंबई आठव्या क्रमांकावर आहेत. कर्णधार शिखर धवन खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर असल्याने आघाडीच्या फळीवर पॉवर प्लेमध्ये वेगाने धावा जमविण्याचे आव्हान असेल. शशांक सिंह व अशुतोष शर्मा या नव्या दमाच्या फलंदाजांनी पंजाबसाठी चांगली कामगिरी केली आहे. या खालच्या क्रमांकावरील फलंदाजांनी आपला संघ संकटात असेल तेव्हा संकटमोचकाची भूमिका चोखपणे बजावलेली आहे. प्रभसिमरन सिंह व यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्मा यांना कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे. अष्टपैलू सॅम करणवर कर्णधारपदाची धुरा असून त्याच्यासह वेगवान गोलंदाज पॅगिसो रबाडा या परदेशी खेळाडूंवर पंजाबची मदार असेल. अर्शदीप सिंह (9 बळी) व हर्षल पटेल (7 बळी) या हिंदुस्थानी गोलंदाजांकडूनही पंजाबला आशा असतील.

मुंबईत मनोमिलनाचा अभाव

मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद रोहित शर्माकडून काढून हार्दिक पंडय़ाकडे देण्याचा निर्णय संघव्यवस्थापनाचा निर्णय साफ चुकलेला दिसतोय. कारण या संघात खेळाडूंच्या मनोमिलनाचा अभाव स्पष्टपणे दिसतोय. पराभवाच्या हॅटट्रिकनंतर मुंबईने दिल्ली आणि बंगळुरू या संघाला पराभूत केले, मात्र त्यानंतर रोहित शर्माच्या शतकी खेळीनंतरही चेन्नईविरुद्धच्या लढतीत मुंबईला पराभव पत्करावा लागला. हार्दिक पंडय़ाचा फॉर्म व त्याच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. गोलंदाजीतही तो महागडा ठरतोय. जिराल्ड कोत्झी (9 बळी) व आकाश मधवाल (4 बळी) यांनीही दहाच्या सरासरीने धावा दिल्या आहेत. प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने पंडय़ाच्या कामगिरीवर वाईट परिणाम झालेला आहे. त्यामुळे रोहित शर्मा व इशान किशन या सलामीच्या जोडीला मोठी जबाबदारी उचलावी लागणार आहे. याचबरोबर दुखापतीतून  सावरल्यानंतर पुनरागमन करणार्या सूर्यकुमार यादवने संमिश्र कामगिरी केली आहे. मुंबईला त्याच्याकडून पुन्हा एकदा स्पह्टक फलंदाजीची अपेक्षा असेल.