इराकमधील इस्रायली दूतावासावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला

इराणी सैन्याने इराकमधील इस्रायली दूतावासावर क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यात चौघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. इराकच्या कुर्दिस्तान भागात हा हल्ला करण्यात आला आहे. इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्पस (IRGC) ने दावा केला आहे की त्यांनी इराणमधल्या कुर्दिस्तान भागातील मोसादचे मुख्यालय उद्धवस्त करण्यासाठी क्षेपणास्त्रे डागली. मोसाद ही इस्रायलची गुप्तचर संघटना असून ही संघटना इस्रायली दूतावासातून इराणविरोधी कृत्ये करत होती असा आरोप करत हा हल्ला करण्यात आला आहे.

आय.आर.जी.सीने मोसाद मुख्यालया प्रमाणेच इस्लामिक स्टेटसचे अड्डाही उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. सिरीयामधील अड्डा क्षेपणास्त्र डागून उद्ध्वस्त केल्याचा दावा इराणने केला आहे. कुर्दिस्तानची राजधानी एरबिलपासून सुमारे 40 किमी उत्तर-पूर्वेस, अमेरिकी दूतावास तसेच नागरी निवासस्थाने असलेल्या एका भागात स्फोटांचे आवाज ऐकू आले होते. दोन अमेरिकन अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितले की, क्षेपणास्त्रांमुळे अमेरिकेच्या तिथल्या कोणत्याही मालमत्तेला किंवा साधनसामुग्रीला बाधा पोहोचलेली नाही. या हल्ल्यात किमान चार नागरिक ठार झाले असून सहा जण जखमी झाले आहेत.

हल्ल्यात उद्योगपती दिझाई यांचा मृत्यू

इराकी सुरक्षा दलाशी निगडीत व्यक्तींनी सांगितले की इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात कुर्दिश व्यापारी पेशरा दिझाई आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. दिझाई यांच्या घरावरच क्षेपणास्त्र आदळलं होतं. दिझाई हे इराकमधील सत्ताधारी बरझानी यांते निकटवर्तीय होते. कुर्दिस्तानमधील अनेक रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये दिझाई कुटुंब गुंतलेले आहे. इराणने डागलेल्या अन्य दोन क्षेपणास्त्रांपैकी एक कुर्दिश गुप्तचर अधिकाऱ्याच्या घरावर तर दुसरे कुर्दिश गुप्तचर केंद्रावर आदळले आहे. या हल्ल्यांनंतर एरबिल विमानतळावरून हवाई वाहतूक बंद करण्यात आली.