जालन्यात मराठा आरक्षणासाठी शेतकर्‍याचे मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन

सध्या राज्यभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापलेला असून ठिक-ठिकाणी मराठा समाजाकडून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी 4 ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील करदन तालुक्यातील गोकुळ येथील एका छोट्याशा खेडेगावातील एका शेतकर्‍याने मोबाईल टॉवरवर चढून मराठा आरक्षणाची मागणी करत आंदोलन केले आहे.तुळशीराम श्रीपत शेळके असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.

टॉवर चढलेल्या शेतकर्‍याने मनोज जरांगे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, आरक्षण देत कसे नाही दिलेच पाहिजे, आरक्षण न दिल्यास आत्महत्या करु, असा इशाराही या शेतकर्‍याने दिला. अनोखा आंदोलनामुळे गावकर्‍यांत चांगलीच घबराट सुटली होती. गोकुळ गावातील काही शेतकर्‍यांनी सुमारे एक ते दीड तास या शेतकर्‍याची समजूत काढत त्याला विनवणी करत गावातील सरपंच -उपसरपंचांनी त्याला टॉवरखाली उतरवले आहे. त्यामुळे सुदैवाने पुढील अनर्थ टळला.