नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं घ्यायचं आणि राज्य मुगलांसारखं करायचं, जालन्यातून संभाजीराजे कडाडले

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. याच पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे यांनी जालना येथे आमरण उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्यासह आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर कठोर शब्दांमध्ये टीका केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचं आणि राज्य मुघलांसारखे करायचे. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन तुम्ही सरकार चालवता आणि दुसऱ्या बाजूला त्यांच छत्रपतींच्या रयतेवर गोळ्या झाडता, मारहाण करता. हे काय मुगलांचं, निजामांचे राज्य आहे का? असा खडा सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला केला.

छत्रपती संभाजीराजे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस सांगा की, गोळ्या चालवणे चूक की बरोबर? शांत मार्गाने चालू असलेले आंदोलन चिरडून टाकतात. येथे काय गोळीबार करता, काय गोळीबार, लाठीमार करायचा तो पहिले माझ्यावर करा, असे आव्हानही त्यांनी सरकारला दिले.

निवडणुकीआधी दंगली घडवण्याचे सरकारचे कारस्थान, पहिली ठिणगी जालन्यात टाकली; संजय राऊत यांचा घणाघात

मनोज जरांगे यांच्यावरील नाही तर हा मराठा समाजावरील हल्ला आहे. केंद्रात, राज्यातही तुमचे सरकार आहे. मराठा समाजाला आरक्षण कसे मिळणार हे सांगण्याऐवजी अत्याचार केला जात आहे. हे घृणास्पद आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आजपर्यंत अनेक समित्या स्थापन केल्या. त्या समितीने काहीही केले नाही. समिती आणि बैठक एवढेच सरकारचे धोरण आहे का? असा सवाल त्यांनी केला.

जालन्यात बंदला हिंसक वळण; तुफान दगडफेक, ट्रक जाळला, 350 जणांवर गुन्हा दाखल

मराठा समाजाच्या आंदोलकांवरील लाठीचार्जनंतर सरकारने फेसबुक पेजवर दोन शब्दात दिलगिरीही व्यक्त केली नाही. हे निंदनीय आहे. याबाबत सरकारने खुसाला करायला हवा. ज्यांनी गोळीबार, लाठीचार्जचे आदेश दिले त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.