IPL 2024 : कोलकात्यापुढे दिल्ली नमली; 18 षटकारांनिशी 272 धावा चोपल्या, दिल्लीचा धावांनी दारुण पराभव

अवघ्या 30 चेंडूंत 196 धावांची आतषबाजी करणाऱया कोलकात्याच्या सुनील नारायण, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल आणि रिंकू सिंग यांच्या झंझावाती फलंदाजीचा तडाखा दिल्लीला बसला. कोलकात्याच्या 273 धावांच्या आव्हानापुढे दिल्ली अवघ्या 166 धावांतच झुकली आणि यंदाच्या आयपीएलमधील पहिला शतकी विजय नोंदवला. हा आयपीएलमधील नववा मोठा विजय ठरला. सनरायझर्स हैदराबादने आठवडय़ापूर्वीच रचलेल्या 277 धावांचा विक्रमी आकडा ओलांडण्याची नामी संधी असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सचे प्रयत्न अवघ्या पाच धावांनी हुकले.

आज कोलकात्याच्या नारायण, सूर्यवंशी, रसेल आणि रिंकू सिंग यांनी मैदानात लावलेल्या चौकार-षटकारांच्या माळेने दिल्लीच्या गोलंदाजीची अक्षरशः खिल्ली उडवली आणि त्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर वैभव अरोराने तीन विकेट्स घेत दिल्लीला पराभवाच्या दरीत ढकलले. अरोरा आणि स्टार्कने दिल्लीची 4 बाद 33 अशी दुर्दशा केली. तेव्हाच दिल्लीचा पराभव निश्चित झाला होता, पण ऋषभ पंत (55) आणि ट्रिस्टन स्टब्स (54) यांनी वैयक्तिक अर्धशतके ठोकत 93 धावांची भागी रचत संघाला शतकापलीकडे नेले. पंतने 5 तर स्टब्सने 4 षटकार खेचले. मग वरुण चक्रवर्तीने 3 विकेट्स घेत दिल्लीचा डाव 16 चेंडूंआधीच 166 धावांवर संपवला.

गेल्या आठवडय़ात हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबादने 277 धावांचा रनवर्षाव केला होता. आज कोलकाताही त्याच दिशेने सुसाट धावली होती. ते सहज 277 धावांचा हिमालय गाठतील, असे वाटत होते, पण इशांत शर्माने केवळ 8 धावा देत 2 विकेट्स घेत कोलकात्याला विक्रमापासून दूरच ठेवले. सलामीला उतरलेला सुनील नारायण आपल्या बॅटीबरोबर वादळच घेऊन आला होता. त्याच्या षटकारबाजीमुळे कोलकात्याने चौथ्याच षटकांत संघाची पन्नाशी गाठली. नारायणने फिल सॉल्टसह 4.3 षटकांतच 60 धावांची सलामी दिली. मग नारायण आणि अंगक्रिश रघुवंशीने दिल्लीच्या गोलंदाजीच्या चिंधडय़ा उडवत 8 षटकांत 104 धावांची अतिआक्रमक भागी रचली.

नारायण आज आयपीएलच्या मोसमातील पहिले शतक झळकावण्याची शक्यता होती, पण 39 चेंडूंत 85 धावा ठोकल्या असताना त्याने आपली विकेट गमावली, मात्र त्याआधी त्याने 7 चौकार आणि तितक्याच षटकारांची फटाकेबाजी करत 14 चेंडूंत 70 धावा चोपल्या होत्या. ही नारायणची टी-20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. रघुवंशीनेही 27 चेंडूंत 54 धावा काढल्या आणि तो आयपीएलमधील सर्वात कमी वयात (18 वर्षे 303 दिवस) पदार्पणात अर्धशतक ठोकणारा फलंदाज ठरला. या दोघांच्या घणाघातामुळे कोलकात्याने 13 षटकांतच पाऊणे दोनशेचा टप्पा गाठला होता.

मग आंद्रे रसेल आणि रिंकू सिंगच्या तुफानी खेळामुळे दिल्लीने शेवटच्या 6 षटकांत 95 धावा चोपल्या होत्या. रसेलने 19 चेंडूंत 41 तर रिंकूने 8 चेंडूंत 26 धावा चोपत कोलकात्याला विक्रमी धावसंख्येसमीप नेले होते. 19 षटकांत 264 धावा काढल्या होत्या आणि विक्रमी 277 धावांना मागे टाकण्यासाठी केवळ 14 धावांची गरज होती, पण इशांत शर्माने अचूक मारा करत केवळ आठच धावा दिल्या आणि कोलकात्याला विक्रमापासून दूरच ठेवण्याची कमाल दाखवली. ही आयपीएलमधील दुसरी सर्वोच्च सांघिक धावसंख्या ठरली. विशेष म्हणजे दोन्ही धावसंख्या एका आठवडय़ात ठोकल्या गेल्या.