दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग, गुंतवणूकदारांना लक्ष्मीदर्शन! तीन लाख कोटी रुपयांची कमाई

दिवाळीच्या मुहूर्तावरील शेअर बाजारातील ट्रेडिंगमध्ये आज गुंतवणूकदारांना खऱया अर्थाने लक्ष्मीदर्शन झाले. बाजार सुरू होण्याआधीच सेन्सेक्स 500 अंकांच्या वर पोहोचला होता, तसेच निफ्टीमध्येही तेजी दिसून आली. तेजीच्या ट्रेंडसह बाजार बंद झाल्याने काही वेळातच गुंतवणूकदारांची अक्षरशः तीन लाख कोटी रुपयांची कमाई झाली.

लक्ष्मीपूजनानिमित्त आज सायंकाळी 6 ते 7.15 वाजेपर्यंत सुमारे सवा तासाच्या मुहूर्त ट्रेडिंगनिमित्त बाजार सुरू करण्यात आला होता. त्याला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सेन्सेक्स 500 अंकांपेक्षा अधिक तेजीसह 65 हजार 400 अंकांच्या वर तर निफ्टी 100 अंकांनी उसळी घेत 19 हजार 550 अंकांवर पोहोचला. बाजार बंद होताना बीएसईचे मार्केट अॅप 3,20,29,232.24 कोटी रुपये होते, तर आज बाजार ओपन होताच मार्केट अॅप 3,23,38,359.97 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. याचाच अर्थ केवळ एका सेकंदात बीएसईच्या मार्केट अॅपमध्ये तब्बल 3,09,127.73 कोटी रुपयांची वाढ झाली.

या शेअरमध्ये तेजी

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर कोल इंडिया, यूपीएल, ओएनजीसी, इन्पहसिस आणि एनटीपीसीच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली, तर बीएसईवर इन्पहसिस, विप्रो, रिलायन्स, टायटन, टीसीएस आणि टाटा स्टीलच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.