आईला समलिंगी पार्टनर सोबत पलंगावर पाहिले, 8 वर्षांच्या मुलाला क्रूरपणे ठार मारले

पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यात 16 फेब्रुवारी रोजी 8 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला होता. त्याच्या हत्येचा उलगडा झाला असून या मुलाच्या हत्येमागचं रहस्य पोलिसांनी उघडकीस आणलं आहे. कोन्नगरमध्ये 8 वर्षांच्या श्रेयांशू शर्मा याची हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येप्रकरणी श्रेयांशूची आई आणि तिची समलिंगी साथीदार यांना अटक करण्यात आली आहे. या दोघींना श्रेयांशूने नको त्या अवस्थेत पाहिले होते. आपले बिंग फुटेल या भीतीमुळे श्रेयांशूच्या आईने पोटच्या मुलाला ठार मारले.

पोलिसांनी सांगितले की श्रेयांशूची आई शांता शर्मा आणि इसरत परवीन यांच्यात समलिंगी संबंध होते. या दोघी शांताचे लग्न होण्यापूर्वीपासूनच्या मैत्रिणी होत्या आणि तेव्हापासून त्यांच्यात समलिंगी संबंध होते. लग्नानंतरही या दोघी वरचेवर भेटत होत्या. शांताचे 2012 साली लग्न झाले तर 2018 साली परवीनचे लग्न झाले होते. लग्नाच्या काही महिन्यांतच परवीनने नवऱ्याचे घर सोडले होते. शांताचेही नवऱ्यासोबत खटके उडत होते. परवीनने नवऱ्याचे घर सोडल्यानंतर तिचे शांताकडे येणे जाणे वाढले होते.

शांता आणि परवीन प्रणय करत असताना श्रेयांशूने त्यांना पाहिले होते. यामुळे घाबरलेल्या शांताने त्याच्या डोक्यावर धातूच्या मूर्तीने वार केले होते. या वारामुळे श्रेयांशू गतप्राण झाला होता मात्र तरीही शांताने त्याला अनेकवेळा चाकूने भोसकले. श्रेयांशूची हत्या करण्यात आणि त्याचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात परवीनने मदत केली होती. परवीनने संशय येऊ नये म्हणून दुसऱ्या दिवशी शांताच्या घरी जाऊन तिचे सांत्वन करण्याचे नाटकही केले होते.