कष्टकरी, शेतकरी, बेरोजगार तरुणांच्या विरोधातलं सरकार हटवूया! शरद पवारांनी रणशिंग फुंकलं

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हाती घेत सरकारला जाब विचारण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या केंद्रातील मोदी सरकार विरोधात येत्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाशिकच्या चांदवड येथे रणशिंग फुंकलं. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते.

चांदवड येथील शेतकऱ्यांच्या प्रचंड सभेला मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सद्य स्थिती लक्षात घेत केंद्रातील मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेला लक्ष्य केलं.

सभेत बोलताना त्यांनी नाशिक आणि काँग्रेसचं नातं सांगितलं. ते म्हणाले, ‘1950 नंतर ऑल इंडिया काँग्रेसचं नाशिकमध्ये अधिवेशन भरलं होतं. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू होते. नाशिक हा म. गांधी, पंडित नेहरू यांच्या विचारांचं स्वागत करणारा जिल्हा आहे’.

‘नाशिक जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात शेतकरी वर्ग आहे. डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना कांद्यांचा प्रश्न उपस्थित झाला होता त्यावेळी मी सभागृहात उत्तर दिलं होतं की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कधी नव्हे तो फायदा होत आहे त्यामुळे त्याविरोधात निर्णय घेणार नाही. पण आता नेमकी उलटी भूमिका आजचं सरकार घेत आहे’, असा आरोप शरद पवार यांनी यावेळी केला.

‘शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं कमी करायचं, कर्ज माफ करायचं, असा निर्णय आम्ही घेतला होता. 70 हजार कोटींचं कर्ज आम्ही माफ केलं. पण आज काय स्थिती आहे. तिच स्थिती परत आहे. शेतकरी संकटात आहे, मात्र आजचे राज्यकर्ते त्यासाठी काही करत नाही. उद्योगपतींचं कर्ज माफ होतं पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत नाही. तेव्हा कष्टकरी, शेतकरी, बेरोजगार तरुणांच्या विरोधातलं सरकार हे सरकार हटवणं हे तुमचं आणि माझं काम आहे. त्यासाठी आपण सामुदायिक शक्ती देऊन संबंध जे करता येईल ते करूया’, असा निर्धार शरद पवार यांनी केला.

‘या देशातील जनतेला, तरुण पिढीचं एक जनमत तयार करण्याची अत्यंत महत्त्वाची कामगिरी राहुल गांधी करत आहेत. त्यांना शक्ती देऊया’, असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं.