Lok Sabha Election 2024 : मी पक्षाचा संस्थापक सदस्य, अजित पवारांनाच पक्षातून काढेन

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक खूपच प्रतिष्ठेची झाली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. त्यातच अजित पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉँग्रेसला समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. जानकर एवढय़ावरच थांबले नाहीत तर त्यांनी मी पक्षाचा संस्थापक सदस्य असून अजित पवार यांनाच पक्षातून काढून टाकेन, असा इशारा दिला आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांना उत्तम जानकर यांनी समर्थन दिले आहे. त्यांच्या प्रचारालाही ते लागले आहेत. माळशिरस तालुक्यात कार्यकर्त्यांच्या एका बैठकीत बोलताना जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मला अजून पक्षातून काढून टाकलेले नाही. मीदेखील दररोज विचारत आहे की, मला पक्षामधून काढले का? कारण पक्षाचा मी संस्थापक सदस्य आहे. शरद पवार यांना अजितदादा काढून टाकत असतील तर उत्तम जानकर यांना अजित पवारांना काढायला अडचण काय? मी निश्चित त्यांना काढू शकतो, असे उत्तम जानकर म्हणाले.

राष्ट्रवादी अजित पवार गटात सध्या उत्तम जानकर आहेत, पण त्यांनी माढा मतदार धैर्यशील मोहिते-पाटील यांना पाठिंबा दिला आहे. तसेच बारामतीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यावर आपण पक्ष सोडू, असे विधान जानकर यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतरही अजित पवार गटाकडून त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.