Lok Sabha Election 2024 : नारायण राणे यांच्यापाठोपाठ किरण सामंतानीही घेतला उमेदवारी अर्ज

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार गुलदस्त्यात असल्याने भाजप आणि मिंधे गटात स्पर्धा रंगली आहे. ही स्पर्धा आता उमेदवारी अर्जापर्यंत पोहचली आहे. भाजपकडून नारायण राणे यांनी उमेदवारी अर्ज घेतल्यानंतर आज मिंधे गटाकडूनही उमेदवारी अर्ज घेण्यात आले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अद्याप ज़ाहीर झालेला नाही. मिंधे गटाकडून किरण सामंत उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत.भाजपकडून नारायण राणे यांचे नाव पुढे आले आहे. नारायण राणे यांनी उमेदवारी अर्ज घेतल्यानंतर मिंधे गटाचीही धडपड सुरू झाली. मिंधे गटाचे जिल्हाप्रमुख राहुल पंडीत आणि अन्य कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज घेतला आहे.

एकीकडे उमेदवार ज़ाहीर झालेला नसताना भाजपने मात्र प्रचारसभेची तयारी केली आहे. 24 एप्रिल रोजी अमित शहा यांची रत्नागिरीत सभा होणार आहे. एकप्रकारे भाजपने मिंधे गटाला गृहीत धरले आहे.