भाजप, मिंधेंची दादा गटाकडून कोंडी; भुजबळ म्हणतात, आमच्याकडेही भरपूर उमेदवार

मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर नाशिक लोकसभेसाठी भाजपा आणि मिंधे गटाने दावा ठोकला. आता अजित पवार गटाचा दावा कायम असल्याचे सांगत इच्छुकांची नावेच मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर करून भाजपा-मिंधे गटाची कोंडी केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्री छगन भुजबळांनी नाशिकची लोकसभा निवडणूक लढवावी, असे सांगितल्याने भुजबळ कामाला लागले होते. मिंधे गट व भाजपातील इच्छुकांकडून त्यांना विरोध होत असल्याने उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत आहे, यामुळे आपण उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेत असल्याचे भुजबळांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. ही जागा भाजपालाच सोडावी, अशी मागणी इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांच्यासह भाजपा नेत्यांनी केली. मिंधे गटातील विद्यमान खासदार हेमंत गोडसे, जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते हे दोन दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून आहेत. गोडसेंनाच उमेदवारी मिळणार, अशी हवा मिंधे गटाकडून निर्माण करण्यात आली. यामुळे अजित पवार गट सरसावला आहे. मी माघार घेतली असली तरी या मतदारसंघावर आमच्या गटाचा दावा कायम आहे, असे छगन भुजबळ यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट करीत मिंधे गट, भाजपाची काsंडी केली. माजी खासदार देवीदास पिंगळे, आमदार माणिकराव कोकाटे, प्रेरणा बलकवडे, निवृत्ती अरिंगळे आदी भरपूर उमेदवार असल्याचे स्पष्ट केले.

भुजबळांसाठी समता परिषदेचा ठराव

ओबीसी समाजाचे वर्चस्व व दबाव कायम ठेवण्यासाठी मंगळवारी भुजबळ फार्मवर तातडीने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक बोलविण्यात आली. निर्णय मागे घेऊन भुजबळ यांनीच ही निवडणूक लढवावी, असा ठराव करण्यात आला. यावेळी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, समाधान जेजूरकर, डॉ. योगेश गोसावी, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, कविता कर्डक, पूजा आहेर, आशा भंदुरे, अंबादास खैरे, योगेश निसाळ, संतोष खैरनार, दिलीप तुपे, गजू घोडके आदी पदाधिकारी, कार्यकर्ते हजर होते. दरम्यान, घेतलेल्या निर्णयावर मी ठाम असून, ही निवडणूक लढणार नाही, असे भुजबळ यांनी पत्रकारांना सांगितले.