Lok Sabha Election 2024 : स्वाभिमान जनसंवाद यात्रेनिमित्ताने निलेश लंके यांचे नगर शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रा अन मोटारसायकल रॅलीला नगर शहरात बुधवारी (दि.17) प्रचंड प्रतिसाद मिळाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी, आप सह आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यामध्ये उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने निलेश लंके यांनी नगर शहरात मोठे शक्तीप्रदर्शन केल्याचे दिसून आले.

शहरातील दिल्लीगेट येथून सकाळी भव्य प्रचारफेरी व मोटारसायकल रॅली काढण्यात आली. याप्रसंगी उमेदवार निलेश लंके, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, आम आदमी पार्टीचे भरत खाकाळ, युवा सेनेचे विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अशोकराव बाबर, संजय शेंडगे, नलिनी गायकवाड, आशा निंबाळकर, संजय झिंजे, गणेश कवडे, बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, सुरेश तिवारी, गिरीष जाधव आदिंसह महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी शहर प्रमुख संभाजी कदम म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारफेरीस नगर शहरातील जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे, यावर त्यांच्या लोकप्रियतेची प्रचिती येत आहे. नगर शहरातून त्यांच्या विजयासाठी शिवसेना प्रयत्नशील असून, जास्तीत जास्त मताधिक्य हे नगर शहरातून मिळवून दिले जाईल. नगरच्या विकासासाठी निलेश लंके हे खासदार होणे गरजेचे आहे. त्यामुळे नगरकरांनी त्यांना उत्स्फुर्त मतदान करावे, असे आवाहन केले.

यावेळी अभिषेक कळमकर म्हणाले, नगरमध्ये आज अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, सध्याच्या खासदाराने काहीही कामे केले नसल्याने आपणास काम करणारा खासदार दिल्लीला पाठवायचा आहे. निलेश लंके यांनी आपल्या आमदारकिच्या काळात पारनेरमध्ये जी विकास कामे केली, त्याच पद्धतीने संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्येही विकास कामे करणारा खासदार झाला पाहिजे, यासाठी निलेश लंके हेच योग्य उमेदवार आहेत, असे सांगितले. यावेळी किरण काळे म्हणाले, लोकप्रतिनिधी कसा असावा, हे निलेश लंके यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे खासदार म्हणून त्यांना लोकांनी स्विकारले आहे, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांच्या पाठिमागे उभी असून, त्यांच्या प्रचार फेरीस मिळत असलेल्या प्रतिसादातून दिसून येत आहे. निलेश लंके यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीचे सर्वच पक्ष सरसावले आहेत. निलेश लंके यांच्या विजयात काँग्रेसचा मोठा वाटा असेल, असे सांगितले.

या प्रचार रॅलीचा शुभारंभ दिल्लीगेट येथून सुरु होऊन ही रॅली प्रभाग क्र.8 ते 13 मधील कल्याण रोड, आदर्शनगर, वारुळाचा मारुती, बालिकाश्रम रोड, तोफखाना, बागडपट्टी, सर्जेपुरा, तेलिखुंट, चितळे रोड, नेता सुभाष चौक, चौपाटी कारंजा, नालेगांव, गाडगिळ पटांगण, पटवर्धन चौक, लक्ष्मी कारंजा, नवीपेठ, कापड बाजार, गंजबाजार, दाळमंडई, मंगल गेट, झेंडीगेट, हातमपुरा, रामचंद्र खुंट, बुरुडगल्ली, माणिकचौक, पंचपीर यावडी, कौठीची तालिम मार्गे माळीवाडा येथील ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात सकाळाचा सत्राचा समारोप झाला. प्रचार फेरी दरम्यान नवीपेठ येथील पुरातन श्रीराम मंदिरात प्रभु श्रीरामाचे लंके यांनी दर्शन घेतले.