Lok Sabha Election 2024 केंद्रीय तपास यंत्रणांच्या दडपशाहीविरुद्ध भडका, तृणमूल काँग्रेसची दिल्लीत निवडणूक आयोगावर धडक

मोदी सरकारच्या इशाऱयावर विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करणाऱया केंद्रीय तपास यंत्रणांच्या दडपशाहीविरुद्ध भडका उडाला आहे. पश्चिम बंगालमधील धाडसत्राचा निषेध करत तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी आज राजधानी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर धडक दिली. हे नेते शांततेच्या मार्गाने आयोगासमोर धरणे आंदोलनाला बसले होते. 24 तास हे धरणे आंदोलन केले जाणार होते. मात्र, पोलिसांनी बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडले. तृणमूलच्या खासदारांना पोलिसांनी फरफटत नेऊन व्हॅनमध्ये कोंबले. महिला खासदारांशीही गैरवर्तन करण्यात आले. त्याचा विरोधी पक्षांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. त्याविरोधात आवाज उठवत तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील गटनेते डेरेक ओब्रायन यांच्या नेतृत्वाखाली आज खासदारांनी निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर धडक दिली. 24 तास आयोगासमोर धरणे आंदोलन करण्याच्या निर्धाराने या खासदारांनी ठाण मांडले. शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करणार. आम्हाला निवेदन सादर करण्याची परवानगीही मिळावी, अशी या सर्वांची विनंती होती. मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून धरणे आंदोलन चिरडले. डेरेक ओब्रायन, डोला सेन, सागरिका घोष, साकेत गोखले, शांतनू सेन या खासदारांना पोलिसांनी अक्षरशः फरफटत नेऊन व्हॅनमध्ये डांबले. महिला खासदारांशी गैरवर्तन केले गेले. सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले आहे.

– खासदार डोला सेन यांच्या पायावर शस्त्रक्रिया झालेली आहे. पोलिसांनी फरफटत नेल्याने त्यांचा पाय दुखावला आहे. सर्वच खासदारांना यावेळी धक्काबुक्की झाल्याचेही सांगण्यात आले.

हे खासदारांचे अपहरण

खासदारांना मंदिर मार्ग येथे नेले जात असल्याचे प्रथम सांगण्यात आले. मात्र त्याऐवजी अन्य ठिकाणी व्हॅन नेण्यात आली. त्यावरून खडाजंगी झाली. तुम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून ही कारवाई करत आहात का, असा सवाल खासदारांनी केला. हे खासदारांचे अपहरण आहे. लोकशाहीवरचा हल्ला आहे, असा आरोप खासदारांनी केला.

तपास यंत्रणांच्या प्रमुखांना हटवा

लोकसभा निवडणुकीत विरोधकांची कोंडी करण्यासाठी नेत्यांना टार्गेट केले जात आहे. राजकीय सूडबुद्धीने अटकेची कारवाई केली जात आहे. यात निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करावा. तत्काळ एनआयए, ईडी, सीबीआय आणि आयकर या केंद्रीय यंत्रणांच्या प्रमुखांना पदावरून हटवावे आणि सर्व पक्षांना समान संधी हे लोकशाहीचे सूत्र पाळावे, अशी मागणी तृणमूलने केली आहे.

हे राजकीय षड्यंत्र

भूपतीनगरमध्ये 2022 मध्ये घडलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात दोन वर्षांनी अटकेची कारवाई केली जात आहे. स्थानिक पोलिसांना कल्पना न देता एनआयएने छापेमारी केली. पहाटे तीन वाजता अधिकारी घरात घुसले. महिलांचा विनयभंग केला गेला. हे एक राजकीय षड्यंत्र आहे. भाजप आणि एनआयए यांच्या बेकायदेशीर युतीतून हे सारे घडवले जात आहे, असा आरोप तृणमूलने केला.