मुंबईत मतदानाचा टक्का घसरण्यामागे मोठे षड्यंत्र; महाविकास आघाडीचा निवडणूक आयोग आणि मिंधे सरकारवर थेट आरोप

मुंबई व महानगर प्रदेशात लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत झालेली दिरंगाई, मतदान पेंद्रांवरील गैरव्यवस्था आणि त्यामुळे घसरलेला मतदानाचा टक्का हे निवडणूक आयोग आणि मिंधे सरकार यांचे मोठे षड्यंत्र होते, असा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. हे षड्यंत्र यशस्वी करण्यासाठीच निवडणुकीपूर्वीच मर्जीतील अधिकारी मुख्य निवडणूक अधिकारीपदी बसवला गेला. पेंद्रांवर मतदारांना जाणीवपूर्वक त्रास दिला गेला, ईव्हीएम मशीन्सचा वेग मंद करण्यात आला, मतदान पेंद्रांवरून मतदार मतदान न करताच माघारी जावेत म्हणून बूथवरील कर्मचाऱयांवर दबाव आणला गेला, असे सांगतानाच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनेक पुराव्यांचाही दाखला दिला आहे. त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकाऱयांकडे तक्रारही केली आहे.

मुंबई व महानगर प्रदेशात निवडणूक अधिकाऱयांनी मतदान प्रक्रियेत जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याने मतदानाची टक्केवारी घसरली. हजारो मतदार मतदानापासून वंचित राहिले. याबद्दल राजकीय पक्ष आणि उमेदवारांप्रमाणेच नागरिकांमध्येही संताप व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीने यासंदर्भात आज जाहीर पुरावे देतानाच राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱयांना याचा जाब विचारला. लोकशाहीत मतदार राजाची अशी हालअपेष्टा का, असा संतप्त सवाल करतानाच मतदान प्रक्रियेतील दिरंगाईबद्दल कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांनी मंत्रालयात मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची आज भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 20 मे रोजी मुंबई व अन्य ठिकाणी मतदान प्रक्रियेत झालेला विलंब, गैरव्यवस्था याबद्दल त्यांनी चोक्कलिंगम यांना विचारणा केली. ओळखपत्रांमध्ये खुसपट काढून, मतदान ओळखपत्राची सक्ती करून प्रक्रियेत विलंब केला गेल्याने मतदारांना चार-चार तास उन्हातान्हात रांगेत उभे रहावे लागले. अशा ढिसाळ व्यवस्थेमुळे अनेक ठिकाणी मतदार त्रस्त होऊन मतदान न करताच परत गेले. मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. पंख्यांअभावी कर्मचारीही उकाडय़ाने हैराण झाले होते. अनेकांना जेवणही मिळाले नाही, याकडेही अनिल देसाई यांनी यावेळी चोक्कलिंगम यांचे लक्ष वेधले.

कर्मचारी मतदारांना सांगत होतेते बटण दाबा

काही मतदान केंद्रांवर आतमधील कर्मचारी इतके धजावले होते की तेच मतदारांना ठरावीक बटण दाबायला सांगत होते, असा आरोप करतानाच, ही काय मोगलाई आहे का? असा सवाल अनिल देसाई यांनी केला. मशालीला जिथे मतदान अधिक होते त्या भागात असे प्रकार घडले, असे ते म्हणाले.

 

निवडणुकीचे काम बेरोजगार तरुणांना सोपवा

शासकीय कर्मचाऱयांकडे आधीच कामाचा मोठा व्याप असतो. त्यात त्यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी सोपवली जाते. देशात इतकी बेरोजगारी वाढली आहे. त्या बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देऊन निवडणुकीचे काम द्या. तसे केल्यास केवळ लोकसभाच नव्हे तर इतर निवडणुकाRसाठीही त्यांचा उपयोग होऊ शकेल, असेही अनिल देसाई यांनी यावेळी सुचवले.

महाराष्ट्रात मतदान कमी व्हावे म्हणूनच आव्हाड

महाराष्ट्रात जाणीवपूर्वक मतदान कमी व्हावे म्हणून निवडणूक आयोग काम करत होता असा आरोप राष्ट्रवादी का@ंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या अकार्यक्षमतेचे, गलथानपणाचे पुरावेच सादर केले.

ईव्हीएम मशीन्सचा वेग कमी केला गेला

एक मत द्यायचे असेल तर किमान दीड मिनिटाचा अवधी लागतो. पण तपासणी व अन्य प्रक्रियेमुळे तीन-चार मिनिटे जातात. यावेळी तर कहरच झाला. मतदान केंद्रांवरील ईव्हीएमचा वेग जाणीवपूर्वक मंद केला गेल्यामुळे मतदान करायला लोकांना चार-चार तास लागत होते ही वस्तुस्थिती आहे, असे आव्हाड म्हणाले. प्रचंड उन्हात चार तास मतदार कसे उभे राहतील, अशी विचारणा करतानाच, मुंब्य्रात 12 मतदार रांगेतच बेशुद्ध पडले, असे आव्हाड यांनी सांगितले. एकाच पुटुंबातील लोकांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर कशी गेली? ईव्हीएम मशीन मंदावल्या कशा? असा सवालही त्यांनी केला.

 

नुसते षड्यंत्र नाही, महाभयंकर षड्यंत्र

मुंबईसह महानगर प्रदेशात मतदार प्रक्रियेत घोळ घालून हजारो मतदारांना त्यांच्या संवैधानिक हक्कापासून वंचित ठेवले गेले. पाशवी महत्त्वाकांक्षेपोटी किंबहुना पराभवाची खात्री झाल्याने भारतीय जनता पक्ष, राज्य सरकार आणि निवडणूक आयोग अशा तिघांनी मिळून रचलेले हे केवळ षड्यंत्र नव्हे, तर महाभयंकर षड्यंत्र होते. याची गंभीर दखल केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी घ्यायला हवी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

याद्यांत मशीनच्या क्षमतेपेक्षा जास्त मतदार घुसवले

एका मशीनवर मतदान करता यावे म्हणून 500 ते 750 मतदारांपेक्षा जास्त मतदारांची यादी नसावी. पण यावेळी निवडणूक आयोगाने मुद्दामून दीड हजार लोकांची एक यादी अशा याद्या तयार केल्या. दीड हजारपैकी साठ टक्के म्हणजे 900 लोक मतदानाला उतरले तर त्यांचे मतदान एका मशीनवर आणि एका खोलीत होणारच नाही. यापूर्वी दीड हजार लोकांसाठी दोन ईव्हीएम मशीन दिल्या जात होत्या, असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. दीड हजार लोकांची यादी करणारा महाभाग नेमका कोण आहे हे निवडणूक आयोगाने तपासले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

घोळ घालण्यासाठी मर्जीतील अधिकाऱयाची नेमणूक केली

पाचव्या टप्प्यात घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत मुंबईत मतदानाची टक्केवारी कमी झाली. याला निवडणूक आयोगाचा अनागोंदीपणा व निष्काळजीपणा जबाबदार आहे, पण यामागे मिंधे सरकारचे मोठे षड्यंत्रही आहे. मतदान प्रक्रियेत घोळ घालता यावा म्हणून मिंधे सरकारने मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची निवडणुकीपूर्वीच बदली करून त्यांच्या जागी मर्जीतील अधिकारी आणून बसवला, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केला.

अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. मतदान प्रक्रियेतील दिरंगाईबद्दल सर्वस्वी मिंधे सरकार जबाबदार असल्याचे ते म्हणाले. श्रीकांत देशपांडे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून निष्पक्षपातीपणे काम करत होते.  मतदार नोंदणी आणि जागृतीसाठी विविध कार्यक्रम राबवले होते. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मतदारांना सोयीचे पडेल अशा ठिकाणी मतदान पेंद्रे उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. परंतु आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मिंधे सरकारने त्यांची बदली करून आपल्या मर्जीतल्या एस. चोक्कलिंगम यांना मुख्य निवडणूक अधिकारीपदी बसवले, असा आरोप दानवे यांनी केला.

उच्चस्तरीय चौकशी करा

श्रीकांत देशपांडे यांची बदली का करण्यात आली? सत्ताधाऱयांना मदत करण्याची भूमिका निवडणूक आयोग व पोलिसांनी घेतली आहे का? याबाबत उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणीही दानवे यांनी केली. 

भाजप उमेदवाराला वाचवण्यासाठी फडणवीसांची धाव

मतदानापूर्वी भाजप व गद्दार उमेदवारांनी पैसे वाटप केले. भांडुपमध्ये अशी घटना शिवसैनिकांनी उघडकीस आणल्यानंतर भाजप उमेदवाराच्या बचावासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जातीने तिथे पोहोचले होते, अशी माहितीही दानवे यांनी दिली.

मुख्य सचिवांच्या दोन बोटांना लावली शाई

निवडणूक अधिकाऱयांच्या निष्काळजीपणाचे उदाहरण देताना अंबादास दानवे यांनी राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या बाबतीत घडलेला प्रकार सांगितला. करीर यांच्या दोन बोटांवर निवडणूक अधिकाऱयांनी शाई लावली. राज्याच्या निवडणूक आयोगांबाबत अशी स्थिती असल्यास सामान्य माणसाचे काय झाले असेल? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.