….तर सर्वसामान्यांचा मतदानाचा अधिकारही धोक्यात येऊ शकतो; नाना पटोले यांनी व्यक्त केली भीती

देशाच्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार असला पाहिजे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. मात्र, त्यालाही काही लोकांनी विरोध केला होता. जे लोक टॅक्स भरतात त्यांनाच मतदानाचा अधिकार असावा, अशी भूमिका काही लोकांची होती. पण डॉ. आंबेडकरांनी तो झुगारुन लावला व मतदानाची ताकद सर्वसामान्यांना दिली. काँग्रेसची सत्ता असताना संविधानाला अबाधित ठेवले गेले पण मागील दहा वर्षात संविधानाचे तीन-तेरा वाजवले. 2024नंतर जर भाजपचे सरकारच आले तर सर्वसामान्यांचा मतदानाचा अधिकार राहिल का नाही? अशी भीती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग व मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती विभागाने संविधान दिनाच्या निमित्ताने दादरमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी संविधानाच्या एक लाख प्रतींच्या वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. त्यापूर्वी राजगृह ते दादर संविधान दिंडी काढण्यात आली. या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली.

नाना पटोले म्हणाले की, भाजपने लोकशाहीचे चारही स्तंभ कमजोर केले आहेत. काँग्रेसने मात्र लोकशाहीच्या या चारही स्तंभाचे स्वातंत्र कायम ठेवले होते. प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य भाजप सरकारने हिरावून घेतले आहे. प्रशासकीय व्यवस्थाही धोक्यात आली आहे. उच्च पदावरील अधिकारी केंद्रीय लोकसेवाच्या माध्यमातून निवडले जातात पण आता भाजप सरकार आरएसएस विचारसरणीच्या मुलांना थेट संयुक्त सचिव पदावर नियुक्त करत आहे. न्यायव्यवस्थेतही हस्तक्षेप केला जात आहे, न्यायाधिशांच्या नियुक्त्यामध्येही केंद्र सरकारची मनमानी चालली आहे. डॉ. बाबासाहेबांचा सामाजिक न्यायाचा रथ भाजपने मागे आणला आहे. आता शांत बसून चालणार नाही, संविधान रक्षणासाठी एकत्र आले पाहिजे. कालपर्यंत काही उद्योग खाजगीकरण केले जात होते पण आता जिल्हा परिषदांच्या शाळांचेही खाजगीकरण केले जात आहे. भाजप सरकार आता शिक्षणचा हक्कही काढून घेत आहे. गरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम सुरु आहे. सर्वसामान्य जनतेला गुलाम बनवण्याचे भाजपचे षडयंत्र आहे,असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला.