मी नाराज असल्याच्या चर्चांना अर्थ नाही; अंबादास दानवेंची स्पष्ट भूमिका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघातील उमेदवारीवरुन ते नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र, मी नाराज असल्याच्या चर्चांना काही अर्थ नाही, मी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करणारा शिवसैनिक आहे, असे सांगत अंबादास दानवे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मी नाराज असल्याच्या चर्चांना अर्थ नाही, मी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करणारा शिवसैनिक आहे. पक्ष प्रमुखांजवळ हट्ट करणे हा माझा अधिकार आहे. आताच्या येणाऱ्या बातम्या बदनामी करणाऱ्या आहेत. मी संघटनेच्या नेत्यांचा आदेश मानणारा नेता आहे. मी सर्वसामान्य शिवसैनिक आहे, माझ्याकडे पक्षाने एवढी मोठी जबाबदारी दिली असताना मी नाराज होणे, इकडे तिकडे जाणे या हवेतील गप्पा आहेत. मी मागच्या दहा वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे, माझी इच्छा मी लपवून ठेवलेली नाही. या मतदार संघात अजूनही साहेबांनी उमेदवार दिलेला नाही, असेही अंबादास दानवे म्हणाले.

माझ्यात आणि इतर नेत्यांच्यात फरक आहे, मी माझ मत बिंदास्त मांडतो. दोन दिवसांपूर्वी कार्यालयाच्या भूमीपूजनाची कल्पना नव्हती. प्रचाराची असेल तर मी इथला जबाबदार पदाधिकारी आहे, याबाबत मी पक्षप्रमुखांना सांगितले आहे. एकांगीपणाने कोण वागत असेल तर पक्ष प्रमुखांच्या कानावर घालावे लागते. मी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली, असेही दानवे म्हणाले.

मागच्या दोन निवडणुकीत मी प्रचारप्रमुख होतो. यावेळीही पक्षप्रमुख देतील ती जबाबदारी मी पार पाडेन. आमचा वाद नाही, पक्षात आमच्यात स्पर्धा आहे. शिंदे गटात मी कधी जाणार नाही, असे दानवे यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत उद्धव ठाकरे मतदार संघातील उमेदवाराचा निर्णय घेत नाहीत तोपर्यंत मी उमेदवारीसाठी दावेदार आहे, छत्रपती संभाजीनगरमधून कोण लढणार हे अजुनही निश्चित झालेले नाही, असेही दानवे म्हणाले.