महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते-पाटील यांचा अर्ज दाखल

माढा लोकसभा मतदारसंघासाठी अकलूजचे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनीही पूरक म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी त्यांच्यासमवेत शीतल धैर्यशील मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोळीळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, सांगोला शेकापचे अनिकेत देशमुख, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी धैर्यशील मोहिते-पाटील यांनी बाळे येथील खंडोबा मंदिरात आरती करून दर्शन घेतले. माढय़ातून महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते-पाटील व महायुतीचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात लढत होणार आहे.

महायुतीचे राम सातपुते, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचेही अर्ज दाखल
सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून राम सातपुते, तर माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आज अर्ज दाखल केला. यावेळी आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार राजन पाटील, आमदार बबन शिंदे, जयंत गोरे, संजय शिंदे, शहाजी पाटील उपस्थित होते. राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी पूरक म्हणून अर्ज दाखल केला आहे. तत्पूर्वी जुना पूना नाका येथील संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून दोन्ही उमेदवारांनी रॅली काढली होती. सातरस्ता येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली.

सोलापूरसाठी 10, तर माढय़ासाठी 7 अर्ज दाखल
सोलापूर मतदारसंघामध्ये 10 जणांनी, तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज 7 जणांनी अर्ज दाखल केला आहे. आतापर्यंत या दोन्ही मतदारसंघासाठी 144 व्यक्तींनी 236 अर्ज नेले आहेत.