मराठ्यांचा विश्वासघात करणाऱ्यांना धडा शिकवणार मनोज जरांगे आक्रमक; 24 मार्चला आंदोलनाची दिशा ठरवणार

सरकारने आचारसंहिता लागू करण्यापूर्वी सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करून मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याचा निर्णय न घेता आचारसंहिता लागू केली. यातून मराठा समाजाचा विश्वासघात करून धोका दिल्याने आता सरकारशी खेटणार, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. 24 मार्च रोजी पुढील आंदोलनाची एक भूमिका, एक निर्णय, एकमत… मराठा समाजाची आंतरवाली सराटीत बैठक घेणार. राज्यभरातील उपोषणकर्ते व सभांचे आयोजक, आंदोलनकर्ते, वकील, अभ्यासक, साखळी उपोषण व उपोषणकर्ते आणि मराठा सेवकांची बैठक आयोजित केल्याची माहिती जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथील पत्रकार परिषदेत दिली.

पुढे ते म्हणाले की, आंतरवाली सराटीसह मराठा समाजावरील राज्यभरातील गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारने वेळोवेळी आश्वासन दिले. मात्र शब्द पाळला नाही. उलट जास्त गुन्हे दाखल करण्याचे काम करून तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम करणार नसल्याचे सांगूनही रात्रंदिवस गुन्हे दाखल करणे गृह मंत्र्याने सुरू केले. आंतरवाली सराटीच्या लोकांवर दबाव टाकणे सुरू आहे. आंतरवाली सराटी महाराष्ट्राच्या मराठा समाजासाठी लढते. आता हे मराठा समाजाच्या अस्मितेचे गाव झाले आहे. येथे त्रास झाला तर राज्याला त्रास होतो, गावासाठी राज्य उठत आहे, आम्हाला वाटले होते की त्यांची मग्रुरी कमी होईल. परंतु त्यांच्या डोक्यात गुन्हे दाखल करून गुंतवण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले.

आता राजकीय सुफडा साफ करणार
आंतरवालीतील लोकांना बीड जिल्ह्यातील जाळपोळीच्या घटनेत चौकशीसाठी तेथील पोलीस अधीक्षक बोलवतात. त्या घटनेशी यांचा काय संबंध. आंतरवाली गाव मराठा आंदोलनाचे मुख्य केंद्र बंद पाडून पुन्हा रोष निर्माण करायचा का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 24 मार्चनंतर मराठा समाज डाव टाकून हरणार नाही, बैठकीत चार-पाच विषयांवर चर्चा होऊन एक निर्णय, एक विचार, एक मत, समाजातून घेणार असल्याचे सांगून आता मराठा राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

बीडमध्ये 29 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
राज्यातील मिंधे सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना अडचणीत आणण्याचे कारस्थान रचले आहे. त्यामुळे सभेत प्रक्षोभक भाषण व वेळेचे उल्लंघन केल्या प्रकरणी बीड जिल्ह्यात जरांगेंसह त्यांच्या 29 सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जरांगेंच्या सभांवर पोलीस नजर ठेवून
मनोज जरांगे-पाटील यांच्या बैठका आणि सभा रात्री उशिरा होत असतात. मात्र आता या सभांवर पोलीस नजर ठेवून आहेत. ज्या-ज्या ठिकाणी अशा बैठका झाल्यात अथवा सभा झाल्यात, त्या ठिकाणी गुन्हे नोंद करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. मागील दोन दिवसांत बीड जिह्यातील माजलगाव ग्रामीण तसेच अंबाजोगाई शहर, नेकनूर अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत तब्बल पाच गुन्हे मनोज जरांगे-पाटील यांच्या विरुद्ध दाखल झाले आहेत.