बेळगावात लोकसभेच्या रिंगणात घुमणार मराठी आवाज!

maharashtra-ekikaran-samiti

गेली कित्येक वर्षे कानडी अत्याचार सहन करत मराठी अस्मितेची लढाई सुरू असलेल्या बेळगाव जिह्यातून आता महाराष्ट्र एकीकरण समिती लोकसभेसाठी उमेदवार देणार आहे. यामुळे बेळगाव जिह्यात पुन्हा एकदा मराठी भाषकांचा आवाज घुमणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक दोन दिवसांनी होणार असून यात मतदारसंघ आणि उमेदवारांची निवड जाहीर केली जाणार आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. आणि याची धग सीमाभागातील मराठी भाषिकांना बसत आहे. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून केली अनेक वर्षे लढा दिला जात आहे. बेळगाव, निपाणी, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मराठी भाषिक हा लढा देत आहेत. 2019 साली महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमा प्रश्नाकडे पेंद्र सरकारचे लक्ष वळवण्यासाठी 48 उमेदवार लोकसभेसाठी उभे करत तब्बल 50 हजारांपेक्षा जास्त मते मिळवली होती.

मराठी उमेदवाराला मोठी संधी

महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणुका ही एक चळवळ म्हणून लढत असते. या आधी मला उमेदवारी मिळाली होती आणि मतदानदेखील चांगले झाले होते. यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत आमची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत उमेदवार आणि मतदारसंघाची निवड जाहीर करण्यात येणार आहे. कर्नाटक सरकार कन्नड सक्ती करत असल्याने मराठी भाषिकांना निर्माण झालेली चीड दूर करण्याची ही एक मोठी संधी आहे, असे महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके म्हणाले.

शुभम शेळके याचे नाव चर्चेत

बेळगावमध्ये 2021 साली लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळके या 26 वर्षांच्या उमेदवाराने सव्वा लाख मतांचा आकडा गाठला होता. यामुळे यंदाही महाराष्ट्र एकीकरण समिती शुभम शेळके यांनाच मैदानात उतरवण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.