अवघ्या अर्ध्या तासांत पोलिसांनी हरवलेला मोबाईल शोधला, मरीनड्राइव्ह पोलिसांनी दाखवली तत्परता

मुंबई पोलीस नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. मात्र आज एका शासकीय पदावर कार्यरत असलेल्या महिला अधिकारी यांचा मोबाईल हरवला असता मरीन ड्राइव्ह पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या अर्ध्या तासांत हरवलेला मोबाईल शोधून काढला.

याबाबत हकीकत अशी की, बुधवार, दिनांक 23 एप्रिल रोजी शासकीय काम आटपून सदर महिला अधिकारी घरी जाण्यासाठी निघाली. त्यावेळी मंत्रालयाच्या समोर असलेल्या मंत्र्यांच्या बंगल्याजवळील शासकीय वसाहतीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या साईबाबांच्या मंदिरात त्या दर्शन घेण्यासाठी गेल्या. तेथे साईबाबांना नमस्कार करताना त्यांचा मोबाईल तिथेच कठड्यावर ठेवला. तेथून मैत्रिणी सोबत घरी जाण्यास निघाल्या. पाच मिनिटे अंतर पार केल्यावर मोबाईल नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या लगेचच त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली मात्र मोबाईल मिळाला नाही. मग त्यांनी थेट मरीन ड्राइव्ह पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी प्राथमिक माहिती विचारली, अर्धा तासांत तांत्रिक माहितीच्या आधारे मोबाईल फोन महिला अधिकाऱ्याच्या हातात दिला. फोन पाहून महिला अधिकारीच्या चेहऱ्यावर आनंद उमटला.

पोलीस उपनिरीक्षक, दीपक ठोंबरे यांनी मोबाईल अर्ध्या तासांत तांत्रिक मदतीच्या सहाय्याने मंत्रालय परिसरातूनच एका व्यक्तीकडे मोबाईल फोन असल्याचे शोधून काढले. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल महिला अधिकारी यांनी मरीन ड्राइव्ह पोलिसांचे आभार मानले.