कोपरगावचे सुपुत्र जवान दीपक आहेर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी गावचे सुपुत्र सैन्य दलातील 253 मीडियम रेजिमेंटचे हवालदार दीपक कृष्णा आहेर यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जमलेल्या जनसागराने ‘अमर रहे… अमर रहे… दीपक आहेर अमर रहे’ अशा घोषणा दिल्या.

हवालदार दीपक आहेर यांच्यावर पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. रविवारी (9 रोजी) पहाटे उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले. दीपक यांच्यावर कोळपेवाडी येथील वैकुंठभूमीमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कोळपेवाडी व सुरेगाव ग्रामस्थ गाव बंद ठेवून अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. महाराष्ट्र पोलीस दल व लष्करी जवानाच्या तुकडीने बंदुकीतून तीन फैरी झाडून हवालदार दीपक आहेर यांना मानवंदना देताच जमलेला जनसागर भावुक झाला.

पुणे येथून कोळपेवाडी शिवेवर पार्थिव दाखल झाल्यानंतर माजी सैनिक दलाच्या वतीने खांदा देऊन लष्कराच्या फुलांनी सजविलेल्या ट्रकमध्ये ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली. बाजारतळावर उभारलेल्या मंडपात दीपक यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते.

यावेळी माजी आमदार अशोक काळे, सैन्य दलाच्या वतीने नायब सुभेदार श्यामसुंदर, तहसीलदार संदीपकुमार भोसले, सुभेदार धन्यकुमार सरवदे, सुभेदार यमाजी चेहडे, पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे, युवराज गांगवे, सुभेदार मारुती कोपरे, सुशांत घोडके, सरपंच सूर्यभान कोळपे, शशिकांत वाबळे, निवृत्ती कोळपे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. दीपक यांच्या पार्थिवावर ठेवण्यात आलेला तिरंगा पत्नी कांचन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. मुलगा साहिल याने हवालदार दीपक आहेर यांच्या पार्थिवाला अग्नी दिला.