सायन- पनवेल मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य, वाशी ते बेलापूर दरम्यान वाहतूककोंडी

गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळत असणाऱ्या पावसामुळे मुंबई व आसपासच्या शहरांमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यांवरील याच खड्ड्यांचा फटका रविवारी सायन पनवेल महामार्गावरील वाहतुकीला बसला. सायन- पनवेल महामार्गावर वाशी ते पनवेल दरम्यान मोठ मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे या मार्गावर चार ते पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे या मार्गावर वाशी ते बेलापूर दरम्यान चार ते पाच किलोमीटर अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना एक तास लागत आहे. सुट्टीचा दिवस असल्याने अनेक जण मुंबई बाहेर फिरण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. मात्र त्यांना नवी मुंबईत या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील भले मोठे खड्डे त्यात वाहतूककोंडी यामुळे वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.