मयांकच्या माऱ्यापुढे बंगळुरूची शरणागती; लखनऊची बंगळुरूवर 28 धावांनी मात

मयांक यादवच्या सुस्साट आणि भन्नाट माऱ्यापुढे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ अक्षरशः कोलमडला आणि या स्टार संघाला आपल्या घरातच सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. क्विंटन डिकॉकच्या 81 आणि निकोलस पूरनच्या नाबाद 40 धावांच्या फटकेबाजीने लखनऊ सुपर जायंट्सला 5 बाद 181 अशी दणदणीत मजल मारून दिली होती, तर बंगळुरूचा संघ 153 धावांतच आटोपला आणि लखनऊने 28 धावांनी विजय मिळवित गुणतालिकेत चौथे स्थान संपादले.

डिकॉक आणि पूरनच्या झंझावातामुळे लखनऊने उभारलेले 182 धावांचे आव्हान बंगळुरूला झेपलेच नाही. विराट कोहली आणि फाफ डय़ु प्लेसिसच्या खेळावर बंगळुरूचे भवितव्य अवलंबून होते. विराटने जोरदार सुरुवात केली, पण तो संघाला फार मोठी भागी रचून देऊ शकला नाही. फलकावर 40 धावा लागल्या असताना तो बाद झाला आणि बंगळुरूचा दांडिया सुरू झाला. विराटनंतर बंगळुरूच्या एकाही फलंदाजाला लखनऊच्या गोलंदाजांनी उभे राहू दिले नाही.

त्याआधी फाफ डय़ु प्लेसिसने टॉस जिंकून लखनऊला फलंदाजी दिली आणि मैदानात उतरलेल्या डिकॉकने बंगळुरूच्या गोलंदाजांना अक्षरशः फोड फोड फोडले. त्याने कर्णधार लोकेश राहुलबरोबर 53 धावांची सलामी दिली. राहुलने 20 धावा केल्या, पण लखनऊच्या डावाला आकार दिला तो डिकॉकने. त्याने 5 षटकांची आतषबाजी करताना 56 चेंडूंत 81 धावा चोपल्या. यात 8 चौकारांचाही समावेश होता. देवदत्त पडिक्कल लवकर बाद झाला, पण मार्कस स्टॉयनिसबरोबर 56 धावांची भागी रचली. 3 बाद 129 नंतर पूरन मैदानात उतरला. शेवटच्या सहा षटकांत त्यांनी 52 धावांची भर घातली. त्यापैकी पूरनच्या 40 धावा होत्या. 10 चेंडूंत 8 धावा करणाऱया पूरनने शेवटच्या 2 षटकांत पाच उत्तुंग षटकार ठोकत लखनऊला 181 धावांपर्यंत नेले. लखनऊने षटकारांची फटाकेबाजी करतना 14 षटकार खेचले. फलंदाजीत अपयशी ठरत असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने 23 धावांत देत 2 विकेट टिपल्या.

मयांकचा घातकी स्पेल
विराट बाद झाला. मग दुर्दैवीरीत्या डय़ु प्लेसिस धावचीत झाला आणि त्यानंतर मयांक यादवच्या अंगावर शहारे आणणाऱया अतिवेगवान चेंडूंनी बंगळुरूच्या फलंदाजीला कापून काढले. मग मयांकने ग्लेन मॅक्सवेलला शून्यावर बाद करून बंगळुरूला हादरवले. त्यानंतर कॅमेरून ग्रीन आणि जमण्याचा प्रयत्न करणाऱया रजत पाटीदारला बाद करून लखनऊचा विजय निश्चित केला. आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये अवघ्या 14 धावांत 3 विकेट टिपत मयांकने बंगळुरूच्या विजयाच्या स्क्रिप्टवर नवीन-उल-हकने शिक्कामोर्तब केले. त्यानेही 25 धावांत 2 विकेट टिपल्या.

बंगळुरूचे रथी-महारथी अपयशी
गेल्या डावात मोठी खेळी करूनही विराट संघाला विजय मिळवून देऊ शकला नव्हता, मात्र आज तो अपयशी ठरला. डय़ु प्लेसिस (19), रजत पाटीदार (29), अनुज रावत (11) आणि महिपाल लोमरूर (33) हेच दोन अंकी धावा करू शकले, पण एकही संघाला सावरू शकला नाही. त्यामुळे बंगळुरूचा पराभव निश्चित झाला होता. मयांकच्या तीन हादऱयांनंतर बंगळुरूचा पराभव पक्का झाला होता. त्यानंतर त्यांच्या फलंदाजांनी केवळ शेवटपर्यंत फलंदाजी करण्याचे प्रयत्न केले.