मिझोराममधून मैतेई समाजाचे पलायन, मणिपूरमधील घटनेचा परिणाम

मणिपूरमध्ये दोन कुकी-झोमी महिलांना विवस्त्र करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा व्हिडिओ समोर आल्याने मिझोराममध्ये राहणाऱ्या मैतेई समुदायात दहशत निर्माण झाली आहे. मिझोराममधील मैतेई समुदायाच्या सदस्यांना काही तरुणांनी लवकरात लवकर राज्य सोडण्याची धमकी दिली आहे. यामुळे आता मिझोराम राज्यातून मैतेई समाजाचे लोक स्थलांतरित होऊ लागले आहेत. शनिवारी अनेकांनी राज्य सोडले. काहींनी विमानतळ आणि इतर सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. या भीषण परिस्थितीत गरज पडल्यास चार्टर विमानाने त्यांना सुरक्षितपणे आणले जाईल असे मणिपूर सरकारने म्हटले आहे.

मिझोराममधील मिझो लोकांचे मणिपूरच्या कुकी-झोमी लोकांशी जवळचे जातीय संबंध आहेत. ते शेजारच्या राज्यातील या समुदायांच्या विकासावर बारकाईने लक्ष देतात. 3 मे रोजी हिंसाचार सुरू झाल्यापासून, मणिपूरमधील 12,584 कुकी-झोमी लोकांनी मिझोराममध्ये आश्रय घेतला आहे. पीस एकॉर्ड एमएनएफ रिटर्नीज असोसिएशन (पीएएमआरए) ही मिझोराममधील मिझो नॅशनल फ्रंट अतिरेक्यांची एक संघटना आहे. कुकी आणि झोमी समाजातील महिलांसोबत घडलेल्या अमानुष घटनेबद्दल या संघटनेला तीव्र संताप आहे. शुक्रवारी एक निवेदन जारी करून संघटनेने मिझोराममध्ये राहणाऱ्या मैतेई समुदायाच्या लोकांना उघडपणे धमकी दिली होती.

या संघटनेने मिझोराममध्ये राहणाऱ्या मैतेईंना स्वतःचा जीव वाचवायचा असल्यास लवकरात लवकर राज्य सोडण्याची धमकी दिली होती. निवेदनात म्हटले आहे की मणिपूरमधील कुकी आणि झोमी समुदायातील दोन महिलांचा समावेश असलेल्या या भीषण घटनेने मिझो लोकांच्या भावना दुखावल्या आहेत आणि त्यामुळे येथे राहणे मैतेईंसाठी आता सुरक्षित राहिलेले नाही.

मिझोरामची राजधानी आयझॉलमध्ये सरकारी कर्मचारी, विद्यार्थी आणि कामगारांसह सुमारे 2,000 मेईतेई लोक राहतात. यापैकी अनेक जण आसामच्या बराक खोऱ्यातील आहेत. शुक्रवारी रात्री ही धमकी दिल्यानंतर, डीआयजी नॉर्दर्न रेंज, मिझोरम यांनी एक आदेश जारी केला होता, ज्यात आयझॉलमधील मैतेइंच्या सुरक्षेसाठी प्रत्येक ठिकाणी सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले होते. शनिवारी दुपारपर्यंत काही मैतेई आधीच राज्याबाहेर गेले होते. त्यामध्ये आयझॉलमधील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या मेईतेई समाजातील एक महिला होती.