अल्पवयीन मुलीला फूस लावून अत्याचार, दोघांना सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्यासह पीडित मुलीला खोलीत कोंडून ठेवणाऱ्याला सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी हा निकाल दिला आहे. मनीष ऊर्फ मॅडी ऊर्फ मनोज दगडू अहिरे (रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर) व प्रवीण रघुनाथ शेवाळे (रा. वडगाव गुप्ता, ता. नगर) अशी आरोपींची नावे आहेत.

अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी अकोले पोलीस ठाण्यात दिली. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवाजी भांगरे यांनी केला. त्यानंतर सदरचा तपास पोलीस उपनिरीक्षक आर. जी. बर्डे यांच्याकडे देण्यात आला. तपास सुरू असतानाच पीडित मुलगी शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाली. शिर्डी पोलिसांनी अकोले पोलिसांना संबंधित मुलीविषयी माहिती दिली. त्यानुसार तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बर्डे यांनी शिर्डी येथून या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन तिच्यासह आई-वडिलांना अकोले पोलीस ठाण्यात आणले.

त्यानंतर उपनिरीक्षक बर्डे यांनी पीडित मुलीकडे चौकशी करून जबाब नोंदवून घेतला. त्यात ती चाकण येथे राहत असताना मनीष आहिरे हा नेहमी तिचा पाठलाग करून ‘तू मला आवडतेस, तू माझ्याशी बोलली नाहीस तर मी तुझ्या आई-वडिलांना जिवे मारेन’, अशी धमकी तो देत असे. त्याला समजावून सांगण्यासाठी ती चाकण येथे गेली असता, मनीष याच्या मित्रांनी तिला तेथून पुणे येथे नेले. तेथे मनीष भेटला. पुणे येथून मनीषने दुचाकीवरून तिला शिक्रापूर येथे आणले. त्याचा मित्र प्रवीण शेवाळे हा चारचाकी गाडी घेऊन शिक्रापूर येथे आला.

तेथून त्या दोघांनी चारचाकीमधून तिला नगर येथे घेऊन गेले. तेथे एका शाळेच्या स्टाफ रुममध्ये तिला कोंडून ठेवले. तेथे मनीष आणि प्रवीणने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. सात दिवस ती मनीष व त्याच्या मित्रांच्या ताब्यात होती. अखेर सातव्या दिवशी मनीष व त्याचा भाऊ तिला शिर्डीत घेऊन गेले. साईबाबा मंदिराजवळ तिला सोडून ते पळून गेल्याचा जबाब पीडितेने दिला होता. त्यानुसार अकोले पोलिसांनी आरोपी मनीष अहिरे व प्रवीण शेवाळे यांना तत्काळ अटक केली. सरकारपक्षातर्फे ऍड. बी. जी. कोल्हे यांनी काम पाहिले.