मनी लाँडरिंग कायद्याचा गैरवापर; शत्रूवरही अशी वेळ येऊ नये शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतली अनिल देशमुख यांची भेट

देशात मनी लाँडरिंग कायद्याचा गैरवापर होतोय. ज्या पद्धतीने माझ्यावर तसेच अनिल देशमुख, नवाब मलिकांवर कारवाई करण्यात आली आहे. यावरून कायद्याचा आणि सत्तेचा कशा पद्धतीने गैरवापर होतोय हे दिसून येईल. पण आम्ही कायद्याची लढाई लढून घरी परतलो. या काळात आमच्या कुटुंबावर कशी वेळ आली असेल सांगू शकत नाही. अशी वेळ शत्रूवरही येऊ नये, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते-खासदार संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आमच्यासारखे राष्ट्रभक्त कोणाला दहशतवादी वाटत असतील तर संविधानातल्या अनेक व्याख्या बदलाव्या लागतील. राज्याची सत्ता अडीच वर्षे आमच्या हातात होती. यूपीएच्या काळातही आम्ही सत्ता जवळून बघितली, मात्र आम्ही कधी  शत्रूशीही इतक्या अमानुषपणे वागलो नव्हतो. याला लोकशाही म्हणत नाहीत, असा टोला त्यांनी  लगावला.

 यामागच्या राजकीय सूत्रधारांवर नक्कीच कारवाई होईल

अनिल देशमुख यांना जामीन देताना ‘सीबीआय’ आणि ‘ईडी’वर दोन्ही वेळेला उच्च न्यायालय आणि सर्वेच्च न्यायालयाची तपास यंत्रणांबाबत निरीक्षणे फार गंभीर आहेत. माझ्या बाबतीतसुद्धा ईडीच्या कोर्टाने नोंदवलेली निरीक्षणेसुद्धा अत्यंत गंभीर आहेत. ज्या तपास यंत्रणांनी चुकीची कारवाई केली, राजकीय सूत्रधार म्हणून ज्यांनी काम केले त्यांच्यावर भविष्यात कारवाई नक्कीच होईल,’ असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.