गाळ किती काढला, सौंदर्यीकरणाचे काय झाले? मिठी नदीच्या कामाची ‘एसआयटी’ चौकशी होणार

मुंबईतील महत्त्वाची नदी असलेल्या मिठी नदीचे खोलीकरण, रुंदीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या कामासाठी महापालिका आणि ‘एमएमआरडीए’कडून गेल्या 17 वर्षांपासून 1300 कोटींवर खर्च होऊनही आवश्यक त्या प्रमाणात काम झालेले नाही. दरवर्षी पुराची स्थिती आणि काही भागातील रहिवाशांना धोक्याची स्थिती निर्माण होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत मिठी नदीतून किती गाळ काढला, कुठे टाकला, किती खोलीकरण-रुंदीकरण झाले आणि सौंदर्यीकरणाची कोणती कामे झाली याची ‘एसआयटी’कडून चौकशी करण्यात येणार असल्याचे आज कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत जाहीर केले.

मिठी नदीच्या कामासाठी कोटय़वधीचा खर्च होऊनही अपेक्षित काम झाले नसल्याचे सांगत भाजपचे प्रसाद लाड यांनी लक्षवेधी सूचना मांडली. ‘चितळे’ समिती आणि ‘आयआयटी’ मुंबईच्या सल्ल्यानुसार काम सुरू असले तरी मिठी नदी अजूनही प्रदूषित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सरकारने झालेल्या कामाची माहिती देण्याची मागणी केली. यावेळी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार ऍड. अनिल परब यांनी मिठी नदीचे काम केवळ पालिका नाही तर ‘एमएमआरडी’कडूनही होत असल्याचे स्पष्ट केले. 2005 ते 2013 पर्यंत हे काम पालिका करीत होती. यानंतर या कामात ‘एमएमआरडी’ आल्याचे ते म्हणाले. 2005 मध्ये मिठीला आलेल्या पुरानंतर हे काम सुरू आहे. त्यामुळे सर्व कामाची चौकशी बिनदिक्कत करा, असेही स्पष्ट केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या वतीने उत्तर देताना कॅबिनेट मंत्री उदय सामंत म्हणाले की, मिठी नदीचे काम नियोजनबद्ध आराखडय़ानुसार दोन टप्प्यांत सुरू आहे. यामध्ये नदीतून काढलेला गाळ भिवंडी येथे टाकला जात असून सौंदर्यीकरणाचे कामही केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

चिखलाचे वाटेकरी कोण?
मिठी नदीच्या कामावरून चौकशी मागणी करणाऱयांना शिवसेनेचे आमदार ऍड. अनिल परब यांनी खडे बोल सुनावले. मिठी नदीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आताच दिसले का, असा सवाल करतानाच सखोल चौकशी करा आणि नदीतील चिखलाचे वाटेकरी कोण होते याचा शोध घ्या, असा टोलाही त्यांनी लगावला. यामध्ये कंत्राटदार दोषी आढळल्यास त्याला ब्लॅक लिस्ट करा, असेही ते म्हणाले. दरम्यान, नदीमधील गाळ काढण्याचे काम परिणामकारक होण्यासाठी कंत्राटदारावर ‘जीपीएस’ ट्रकिंगने नजर ठेवा, अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी केली.