गुजरात विद्यापीठाच्या होस्टेलमध्ये नमाज पढणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांवर जमावाचा हल्ला; दगडफेक, गाड्यांची तोडफोड

अहमदाबादमधील गुजरात विद्यापीठाच्या (Gujarat University) होस्टेलमध्ये तुफान राडा झाला आहे. रमजान सुरू असल्याने होस्टेलमध्ये नमाज पढणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांना जमावाने बेदम मारहाण केली. जमावाने घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या रुमची तोडफोड केली, तसेच दगडफेक करत गाड्याही फोडल्या. यामुळे तणावाचे वातावरण असून पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी 20-25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अहमदाबादचे पोलीस आयुक्त जीएस मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

गुजरात विद्यापीठामध्ये जवळपास 300 विदेशी विद्यार्थी शिक्षण घेतात. यापैकी 70 विद्यार्थी होस्टेलच्या ‘ए ब्लॉक’मध्ये राहतात. शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास विदेशी विद्यार्थ्यांचा एक गट नमाज पठण करत होता, त्याचवेळी 20-25 जणांचा एक जमाव तिथे पोहोचला. जमावाने विद्यार्थ्यांना ‘तुम्ही इथे नमाज का पठण करता? असे विचारत मशिदीज जाऊ पठण करा असे म्हटले. यामुळे दोघांमध्ये या मुद्द्यावरून बाचाबाची झाली. यादरम्यान जमावाने विद्यार्थ्यांना मारहाण करत दगडफेक केली. तसेच त्यांच्या खोल्यांमध्येही धुडगूस घालत सामानाची आणि होस्टेलच्या आवारात लावलेल्या दुचाकींचीही तोडफोड केली, अशी माहिती अहमदाबादचे पोलीस आयुक्त जीएस मलिक यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, पोलिसांनी योग्य ती कारवाई केली असून 20-25 जणांच्या जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये गुंतलेल्या सर्वांना योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. जमावातील एकाची ओळखही पटली असून सध्या कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रण आहे. जमावाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी एक श्रीलंकेचा असून दुसरा तझाकीस्तानचा रहिवासी आहे.

दरम्यान, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी गुजरात विद्यापीठात घडलेल्या घटनेवरून संताप व्यक्त केला असून मुसलमान आता शांततेने नमाजही पठण करू शकत नाही का? असा सवाल एक्स अकाऊंटवरून केला आहे. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना टॅग केले आहे. तर दुसरीकडे गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी याप्रकरणाची दखल घेत गुजरात विद्यापीठ प्रशासन आणि अहमदाबादचे पोलीस आयुक्तांना कारवाईचे निर्देश दिले आहेत.