शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा दिल्लीत येऊ देऊ नका; उद्धव ठाकरे कडाडले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा यवतमाळ वाशीम मतदरासंघातील कारंजा येथे जनसंवाद मेळावा झाला. त्यात त्यांनी मिंधे आणि भाजपला चांगलेच झोडपून काढले. आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून मोदी सरकार रोखत आहे. शेतकऱ्यांच्या रस्त्यात खिळे टाकून तारेचे कुंपण उभारण्यात येत आहे. शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या मोदी सरकारला दिल्लीत पुन्हा येऊ द्यायचे नाही, यासाठी आता शेतकऱ्यांनी मैदानात उतरण्याची गरज आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आपण दोन दिवस विदर्भात फिरतोय. सूर्य आग ओकतोय. मात्र, सूर्यापेक्षा जास्त आग थापाड्या भाजप सरकारविरोधात पेटली आहे. आपण 10 वर्षे त्यांना सहन केले आहे. 2014 पासून आतापर्यंत. 2014 मध्ये अच्छे दिन आयेंगे असे सांगितले होते. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल. अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. त्यातील एक गोष्ट तरी पूर्ण झाली आहे काय, असा सवाल करत त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्याने जनतेत त्यांच्याविरोधात आग पेटली आहे, असे ते म्हणाले.

आता त्यांच्याकडे उमेदवारच नाहीत. त्यामुळे इकडून तिकडून गोळा करत आहेत. ते जे गोळा करत आहेत, ते सर्व भ्रष्ट लोक आहेत. ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाही जवळ केले. समृद्धी महामार्गाचे काम कोणी अडवले होते, का अडवले होते. कोणत्या कंत्राटदारासाठी अडवले होते, ते तुम्हाला माहिती आहे. सेवालाल महाराजांची शिकवण होती, महिलांशी कसे वागायचे आणि मुली या देवतेसमान असतात. ते कसे वागले होते. त्यांना आपण मंत्रीमंडळातून काढून टाकले होते. त्यांच्यावरील आरोप गंभीर होते. काही गद्दारांनी गद्दारी करून सरकार पाडले आणि आपण हटवलेल्या माणसाला पुन्हा मंत्रीपद दिले. आता आपल्याला गद्दारांना पाडयचे आहेच, आताच ते पडले आहेतच. समाजासाठीचा 750 कोटींचा भूखंड गद्दारांच्या घशात अशी बातमी आली होती. समाजाच्या नावावर स्वतःचे खिसे भरत आहेत. सेवालाल महाराजांची शिकवण तुम्ही विसरलात. समाजाची फसवणूक केली, आता हा समाज त्यांना पुन्हा निवडून देणार आहे का,असा सवालही त्यांनी जनतेला केला. हा भ्रष्टाचार आणि राखी बांधणाऱ्या बहिणीचा भ्रष्टाचार मोदी यांनी दाबून टाकला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

70 हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप कोणी, कोणावर केला होता. आरोप झालेले अजित पवार आज कोठे आहेत, आदर्श घोटाळाप्रकरणी अशोक चव्हाण यांच्यावर आरोप झाले होते, ते आज कोठे आहेत. मिंध्यासोबत पळालेल्या गद्दारांवरही ईडीच्या धाडी पडल्या होत्या. ते गद्दार आज कोठे आहेत. याचा अर्थ काय आहे, ते जनतेला कळले आहे. महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा अशी टीका अमित शहा यांनी केली. मग त्यांच्या ट्रिपल इंजिन सरकारला भ्रष्टाचाराची चाके का लावत आहेत. आमची रिक्षा पंक्चर असली तरी कितीजण यात बसले आहेत ते बघा. त्यांचे ट्रिपल इंजिन सरकार आहे. त्यात त्यांचे इंजिन थापांचा धूर सोडत आहे. अशी भ्रष्टाचाराची चाके लावून त्यांचे इंजिन दिल्लीत जाणार आहे काय, तुमचे पुढचे रुळ जनतेने उखडून टाकले आहेत, आता दिल्लीत कसे जाता ते बघतो असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

2014 मध्ये मोदी यांनी हमीभावाचे वचन दिले होते. उत्तरेतील शेतकरी हमीभावाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. आता शेतकऱ्यांना गप्प करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीत येऊ नये म्हणून रस्त्यात खिळे टाकले आहेत, तारेचे कुंपण आहे, अश्रूधरांच्या नळकांड्या फोडल्या जातात, रबरी गोळ्या झाडल्या जातात, लाठीमार होतो. शेतकऱ्यांना दिल्लीत येऊ न देणारे सरकार पुन्हा सत्तेत येऊ नये, म्हणून शेतकऱ्यांनी मैदानात उतरले पाहिजे. मोदी सरकार दिल्लीत येऊ नये, म्हणून जनतेने त्यांच्या रस्त्यात काटे पेरले पाहिजेत. हुकूमशाही सरकारविरोधात एकजुटीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेने कठीण काळात मोदींना साथ दिली. तेच आता शिवसेना संपवायला निघाले आहेत. शिवसेनेचे नाव चोरले, पक्ष फोडला, शिवसेना हे नाव मोदी यांनी दिलेले नाही. निवडणूक आयोगात बसलेल्या धोंड्यानेही हे नाव दिलेले नाही. शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी दिले आहे. प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण आम्ही घेतला होता, तो आता त्यांनी कलुषित केला आहे. आता चोराच्या हातात धनुष्यबाण आहे. रावणाला शिवधनुष्य पेलले नाही, ते या मिंध्याला पेलणार आहे काय, त्यांना त्यांच्या 40 जणांच्या दाढीचे वजनच पेलत नाही. आताच ते जागावाटपात उताणे झालेत. त्यांना काय शिवधनुष्य पेलणार आहे. शिवधनुष्य पेलण्याची ताकद माझ्या जनतेत आहे, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांना अडवणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा दिल्लीत जाऊ देणार नाही, भाजपकडून कोणीही उमेदवार असेल त्याला गावातील एकही मत मिळू देणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी करायला हवा. शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या हुकूमशाही मोदी सरकारला मत देणार नाही, असे जनतेने ठरवायला हवे. मी माझी लढाई लढायला आलेलो नाही. आपण जनतेची लढाई लढत आहोत. आपल्या सरकारच्या काळात आपण शेतकऱ्यांची कर्जे माफ केली होती. अडीच वर्षात अनेक संकटे आली. कोरोना बोकांडी बसला होता, अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. इतर नासर्गिक आपत्ती आल्या. त्यावेळी केंद्राच्या निकषांच्या बाहेर जात केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचली होती का ते त्यांनी सांगावे, असा सवालही त्यांनी जनतेला केला.

सोयाबीन, कापूस यांचे भाव निम्म्याहून कमी झाले आहेत. कापला हमीभावापेक्षा कमी भाव देणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे सरकारने सांगितले. मात्र, काही व्यापारी शेतकऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी किंमतीत कापूस विकण्यास हरकत नाही, असे ना हरकत पत्र लिहून घेत आहेत. त्यामुळे कोण कोणावर गुन्हे दाखल करणार, हा सवाल आहे. शेतकरी मातीतून सोने पिकवतात, त्या सोन्याला हे पुन्हा मातीचा भाव देत आहे,असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

काँग्रेसने देशाला लुटले, असा प्रचार भाजप करत आहे. मात्र, निवडणूक रोख्यांद्वारे भाजपला सात हजार कोटी मिळाले आहे. तर काँग्रेसला 600 कोटी मिळाले आहेत. तर देशाला कोणी लुटले, भाजपने की काँग्रेसने हे जनतेने ठरवावे. भाजप म्हणेजे भाडोत्री जनता पक्ष त्यांना असे वाटते की ते मोदींच्या फोटोमुळे जिंकत आहे. मात्र, आम्ही हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवरच जिंकलो आहोत आणि जिंकणार आहोत. आता भाजपला समजले की फक्त मोदींच्या फोटोवर विजय मिळणार नाही. त्यामुळे आता माझे वडील चोरायला निघाले आहेत. काय ही अवदसा आली आहे. स्वतःचे वडिलांचे कर्तुत्व सांगण्यासारखे नाही म्हणून दुसऱ्यांचे वडील चोरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, असा हल्लाबोल त्यांनी मिंध्यांवर केला.

आपल्या शिवसेनेचे नाव आहे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हणजे शिवसेनाच आहे. मिंध्यांची शिवसेना आपण मानायलाच तयार नाही. निवडणूक आयोगाचे कोणीही आले तरी त्यांना सांगेन तुम्ही तुमचे काम करा, हे नाव माझ्या वडिलांनी दिलेले आहे. ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे, इथे फिरकायची हिंमत करू नका, शरद पवार यांची राष्ट्रवादीही त्यांनी चोरली. भाजपने आता चोरबाजार मांडला आहे. हरयाणात चौटाला यांचा वापर करून आता साथ सोडली आहे. भाजप ही दगाबाजांची पार्टी आहे. भाजपने त्यांच्या पक्षातील नेत्यांना दिलेले आश्वासनांचाही विसर पडला आहे. गोरखा समुदायासाठी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी भाजप नेत्याने रक्ताने पत्र लिहिले आहे. ही वेळ भाजप नेत्यांवर आली आहे.

मोदी यांनी सभा घ्याव्या पण त्यासाठी किती खर्च करत आहात. येथील सभेसाठी 12 हजार कोटी खर्च केले. ते शेतकऱ्यांना दिले असते, तर शेतकऱ्यांनी त्यांच्या उदोउदो केला असता. आता प्रत्येक वर्तमानपत्रात त्यांचे फोटो असतात. त्यासाठी वारेमाप खर्च करण्यात येतो. आता त्यांचे दाढीवाले फोटो दिसत आहेत. त्यांच्या सभेला बिर्यानी दिली जाते. पैसे देत माणसे बोलावली जातात. आता शेतकरी म्हणून एकजुटीने तुम्हाला शिवसेनेला पुन्हा मतदान करत आपला माणूस दिल्लीत पोहचवायचा आहे. शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या मोदी सरकारला दिल्लीत येऊ द्यायचे नाही, ही आता शेतकऱ्यांची जबाबदारी आहे. ते एकजुटीने ती पूर्ण करतील, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.