मोनो रेल घाट्यात, मेट्रोल 2ए आणि मेट्रो-7 तोट्यात

mumbai-monorail-001

वडाळा ते सातर रस्ता दरम्यान धावणारी मोनो रेल्वे ही पांढरा हत्ती असल्याची टीका सातत्याने केली जात होती. मोनो रेलला चालू आर्थिक वर्षात (2023-2024)मध्ये 529 कोटींचा घाटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. फक्त मोनोच नाही तर मेट्रोलाही घाटा सहन करावा लागत असून 2022-2023 या आर्थिक वर्षात मेट्रो 2ए आणि मेट्रो-7 ला 280 कोटींचा घाटा झाला आहे. मोनोरेलचा पहिला टप्पा (चेंबूर-वडाळा) हा 2014 साली सुरू झाला होता सात रस्त्यापर्यंतचा टप्पा हा मार्च 2019 ला सुरू झाला होता. मोनोरेल प्रकल्पावर सुरूवातीपासून टीका केली जात आहे. ज्या मार्गावर ही रेल चालवली जात आहे त्या मार्गावर फार फायदा होणार नाही अशी भीती वर्तवली जात होती, मात्र तरीही हा प्रकल्प रेटण्यात आला. यामुळे बहुतांश वेळा मोनोच्या गाड्या रिकाम्या धावताना दिसतात.

मोनोरेलला 2022-2023 साली 250 कोटींचा घाटा झाला होता. 2023-2024 मध्ये हा घाटा 529 कोटींपर्यंत जाईल अशी भीती आहे. नव्या गाड्या खरेदी करणे आणि जेकब सर्कल ते महालक्ष्मी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या ट्रॅव्हलेटर यामुळे हा तोटा झाल्याचे सांगण्यात आले आहे. 64 कोटी रुपयांचा खर्च या ट्रॅव्हलेटरसाठी अपेक्षित आहे. हा ट्रॅव्हलेटर मोनोरेल आणि मेट्रो 3ला जोडण्याचे काम करेल. सध्या मोनोरेलच्या 118 फेऱ्या होत असून त्या 250 पर्यंत नेण्यासाठी नव्या गाड्यांची खरेदी केली जाणार आहे. 8 गाड्यांचा ताफा 18 वर नेण्याचा मानस असून या नव्या गाड्यांचा खर्च हा 590 कोटी रुपये इतका आहे. मोनोरेलच्या प्रवाशांची संख्या ही सातत्याने घसरत आहे. कोनोनापूर्वी 18 हजार प्रवासी या सेवेचा लाभ घेत होते आता फक्त 12 हजार प्रवासी मोनोने प्रवास करत आहेत.

गुंदवली-दहिसर-अंधेरी पूर्व या भागांना जो़णाऱ्या मेट्रो 2ए आणि मेट्रो 7 यांनाही तोटा सहन करावा लागत आहे. या मेट्रोंनी दिवसाला 2.3 लाख प्रवासी प्रवास करत असले तरी महिन्याला 23 कोटींचा घाटा या मेट्रोंना सहन करावा लागत आहे. गेल्या आर्थिक वर्षात या मेट्रोंचा खर्च 322 कोटी होता आणि उत्पन्न 41 कोटी इतके होते.