‘बटर चिकन’वरून वादाला उकळी! दोन रेस्टारंटची न्यायालयात धाव

मांसाहारी मंडळींमध्ये बऱ्यापैकी प्रसिद्ध असलेला पदार्थ म्हणजे बटर चिकन. किंचित गोडसर चव असलेला हा पदार्थ जवळपास सर्वच मांसाहारी हॉटेलमध्ये आवडीने खाल्ला जातो. पण, या पदार्थामुळे वादाला उकळी फुटली असून हा वाद आता पार उच्च न्यायालयाच्या दारात पोहोचला आहे.

दिल्लीतील दोन हॉटेलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एक वाद सुरू आहे. त्या दोन्ही हॉटेल्सने आपल्या पूर्वजांनी दोन महत्त्वाचे पदार्थ शोधून काढल्याचा दावा केला आहे. त्यातील एक दरियागंज या प्रसिद्ध हॉटेल साखळीच्या कंपनीने बटर चिकन या पदार्थाच्या उत्पत्तीवरून मोती महल या हॉटेलच्या मालकाला दिल्ली उच्च न्यायालयात खेचलं आहे. त्यापूर्वी मोती महल या हॉटेलच्या मालकांनी आपले पूर्वज कुंदनलाल गुजराल यांनी बटर चिकन आणि दाल मखनी या दोन पदार्थांची निर्मिती केल्याचा दावा केला होता आणि दरियागंज हे हॉटेल फक्त लोकांची दिशाभूल करत असल्याचं म्हटलं होतं. बटर चिकन संदर्भात संबंधित मालकांची मुलाखत वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली होती.

या मुलाखतीत आपल्या हॉटेलचा अवमान केल्याचा आरोप करत दरियागंजच्या मालकांना दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. अशा प्रकारे जाहीरपणे वक्तव्य केल्यामुळे आपल्या हॉटेलच्या प्रतिष्ठेचं नुकसान झालं आहे. त्यामुळे अशी वक्तव्य हटवण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. तर याला युक्तिवाद म्हणून मोती महलच्या मालकांनी संबंधित मजकूर हा संपादकीय विचारांतून आलेला असल्याचं म्हणत अशा कोणत्याही प्रकारचं वक्तव्य केलं असल्याचं अमान्य केलं आहे.

दोन्ही बाजू ऐकल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव नरूला यांनी मोती महलच्या मालकांना प्रतिज्ञापत्र सादर करून संबंधित प्रकाशित लेखातील मजकुराशी त्यांचा कोणताही संबंध नाही, हे सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रतिज्ञापत्र येत्या दोन आठवड्यांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.