मुंबई विमानतळ नामांतराला 20 वर्षे पूर्ण

भारतीय कामगार सेना आणि मुंबई विमानतळ प्रशासनाने साजरा केला ‘गौरवशाली दिन’

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामांतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे होऊन 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त भारतीय कामगार सेना व मुंबई विमानतळ प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस ‘गौरवशाली दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यंदाही या गौरवशाली दिनाचा अलौकिक सोहळा पाहण्यासाठी विमानतळ परिसरातील कामगारांची व पर्यटकांची गर्दी झाली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावे म्हणून शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी असंख्य शिवसैनिकांनी आंदोलन करून, मोर्चे काढून, पोलीस केसेस घेऊन खूप मोठे योगदान दिले आहे. त्याचाच प्रत्यय म्हणून 16 जानेवारी 2004 रोजी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले. तसेच देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते विमानतळ परिसरात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळय़ाचे अनावरण करण्यात आले. मराठी माणसांसाठी व तमाम शिवभक्तांसाठी अभिमानास्पद असलेल्या या क्षणाला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत, भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव, मुंबई विमानतळ प्रशासनाचे एम्प्लॉई रिलेशन्स जनरल मॅनेजर राजेश म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय शंकर कदम यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संतोष कदम, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, योगेश आवळे, पोपट बेदरकर, दिलीप जाधव, सहचिटणीस जगदीश निकम, विजय शिर्पे, मिलिंद तावडे, नीलेश ठाणगे, संजीव राऊत, विजय तावडे, विनायक शिर्पे यावेळी उपस्थित होते.