सय्यदना मुफाद्दल सैफुद्दिन दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरू! हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Dawoodi Bohra Community Leadership

दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरू अर्थात 53 वे अल-दाई अल-मुतलक म्हणून सय्यदना मुफाद्दल सैफुद्दिन यांची नियुक्ती वैध आहे, असा ऐतिहासिक निकाल उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. 52 वे अल-दाई अल-मुतलक सय्यदना महम्मद बुरहानुद्दिन यांनी आपला उत्तराधिकारी व 53 वे अल-दाई अल-मुतलक म्हणून त्यांचे पुत्र सय्यदना मुफाद्दल सैफुद्दिन यांची नियुक्ती केली होती. या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करीत न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी दिलेल्या निकालामुळे दाऊदी बोहरा समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सय्यदना मुफाद्दल सैफुद्दिन यांच्या नियुक्तीला सय्यदना महम्मद बुरहानुद्दिन यांचे सावत्र भाऊ खुजेमा कुतबुद्दिन यांनी आव्हान दिले होते. खुजेमा यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा ताहिर कुतबुद्दिन यांनी विरोध केला होता. याप्रकरणी उच्च न्यायालयात दहा वर्षे सुनावणी चालली. न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी दोन्ही पक्षांकडून देण्यात आलेले पुरावे आणि सविस्तर युक्तिवाद यांचा बारकाईने विचार केला. याबाबत दीर्घ सुनावणी घेतल्यानंतर एकलपीठाने निकाल राखून ठेवला होता. हा निकाल मंगळवारी जाहीर करताना न्यायालयाने 53 वे अल-दाई अल-मुतलक म्हणून सय्यदना मुफाद्दल सैफुद्दिन यांची नियुक्ती वैध ठरवली.

विरोधातील सर्व दावे फेटाळले

सैफुद्दिन यांच्या नियुक्तीला दिलेले आव्हान तसेच मूळ फिर्यादी खुजेमा कुतबुद्दिन व त्यांचा मुलगा ताहिर कुतबुद्दिन यांचे सर्व दावे कोर्टाने फेटाळले. न्या. पटेल यांनी खोटय़ा गोष्टींचा निर्णायकपणे निपटारा केला. तसेच दाऊदी बोहरा धर्माच्या वस्तुस्थिती व धार्मिक सिद्धांतांचे वादींनी केलेले चुकीचे अन्वयार्थ, दिशाभूल करणारे चित्रण नाकारले.

न्यायव्यवस्थेवर सदैव पूर्ण विश्वास

सय्यदना आणि दाऊदी बोहरा समाजाच्या जुन्या समजुती, चालीरिती, प्रथा आणि सिद्धांतांना वेळोवेळी पुष्टी देणाऱया न्यायव्यवस्थेवर आमचा नेहमीच पूर्ण विश्वास आहे. न्यायमूर्तींनी दहा वर्षे या विषयासाठी वेळ दिला आणि गुंतागुंतीच्या प्रकरणाची संयमाने सुनावणी चालवून निर्णय दिला, अशी प्रतिक्रिया दाऊदी बोहरा समाजाने दिली.

दहा वर्षांच्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील इक्बाल छागला यांच्यासह फ्रेडुन वित्रे, जनक द्वारकादास, पंकज सावंत, फिरदोस पुनीवाला (विद्यमान न्यायमूर्ती), अझमीन इराणी, अम्मर फैजुल्लाभॉय, शाहेन प्रधान, जिहान मेहता, चिराग कामदार, दिवंगत इब्राहिम ए. के. फैजुल्लाभॉय, अर्गस पार्टनर्स, अभिजार इब्राहिम फैजुल्लाभॉय, मुर्तजा काचवाला, जैशा सबावाला आदी दिग्गज वकिलांनी युक्तिवाद केला. प्रकरणाच्या सुरुवातीपासून वेळोवेळी हजेरी लावणाऱया विविध लॉ फर्म्स, सर्व साक्षीदारांचे दाऊदी बोहरा समाजाने आभार मानले आहेत.